हजारावर अन्नप्रक्रिया उद्योजक तयार करणार - मिलिंद कांबळे

हजारावर अन्नप्रक्रिया उद्योजक तयार करणार - मिलिंद कांबळे

नागपूर - देशात अन्नप्रक्रिया करणारे एक हजार उद्योजक अनुसूचित जाती-जमाती संवर्गातून तयार करायचे असल्याचा संकल्प दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सने (डिक्की) केला. यातील शंभर उद्योजक विदर्भातील असतील, अशी माहिती डिक्कीचे संस्थापक मिलिंद कांबळे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. 

डिक्कीच्या विदर्भ चॅप्टर आणि केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयातर्फे खाद्य प्रक्रिया उद्योगात एससी आणि एसटी उद्योजकांना असलेल्या संधी या विषयावरील एकदिवसीय कार्यशाळेच्या उद्‌घाटनासाठी आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. कांबळे म्हणाले, एससी आणि एसटी संवर्गासाठी केंद्रीय अन्नप्रक्रिया उद्योग मंत्रालयाने खाद्यान्न प्रक्रिया उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी काही योजना आणल्या. त्या योजना डिक्कीच्या माध्यमातून पोहचविण्यासाठी देशभरात आठ कार्यशाळा घेण्यात येतील. नागपुरातून या कार्यशाळेचा शुभारंभ झाला. कार्यशाळेला अन्न व प्रक्रिया उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ, यशस्वी उद्योजक मार्गदर्शन करणार आहेत. डिक्की विदर्भ चॅप्टरला शंभर उद्योजक तयार करण्याचे उद्दिष्ट दिले आहे. त्यात 50 टक्के महिलांचा समावेश राहणार आहे. अर्थसाहाय्य देण्यासाठी बॅंकांसोबत करार करण्यात येईल. त्यामुळे एससी आणि एसटी उद्योजकांना कर्ज मिळणे सुलभ होईल. 

भारतातील अन्नप्रक्रिया उद्योगाची उलाढाल सध्या 31 लाख कोटी आहे. 2020 पर्यंत ती 65 लाख कोटींवर जाईल, असेही त्यांनी सांगितले. अन्न व प्रक्रिया उद्योगात कमी भांडवल आणि चांगले उत्पादन मिळू शकते. एससी आणि एसटी उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी अन्नप्रक्रिया मंत्रालयाने 50 टक्के अनुदान देण्याचे निश्‍चित केले. याशिवाय राज्य सरकारकडूनही एससी व एसटी उद्योजकांनी घेतलेल्या कर्जाच्या पाच टक्के व्याजाचे अनुदान मिळणार आहे, असे कांबळे म्हणाले. पत्रकार परिषदेला पश्‍चिम भारताचे अध्यक्ष निश्‍चल शेळके, विदर्भ चॅप्टरचे अध्यक्ष गोपाल वासनिक, क्रांती गेडाम, विनी मेश्राम, केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाचे अधिकारी डॉ. जितेंद्र डोंगरे उपस्थित होते. 

फूड प्रोसेसिंग इन्स्टिट्यूट लवकरच 
अन्नप्रक्रिया उद्योगात एसस्सी व एसटी उद्योजकांना अर्थसहाय्य पुरवठा करण्यासाठी फूड प्रोसेसिंग फायनान्शियल इन्स्टिट्यूटची स्थापना करण्यात येणार आहे. त्यासाठी वेगळे मंत्रालय स्थापन करण्याची योजना आहे. येत्या चार महिन्यात त्याची स्थापना होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com