माळी म्हणाले; सातपुडा वाचवण्यासाठी वनविभाग कटीबद्ध !

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 मार्च 2020

मागील चार वर्षांपासून सूनगावचे पर्यावरण प्रेमी नागरिक व लोकप्रतिनिधी एकत्र येत सातपुडा बचाव समिती नावाने सातपुड्यातील उंबरदेव ते कुवरदेव हा अतिमहत्त्वाच्या अंदाजे 40 बाय 55 किमी. आकाराचे संपन्न वन वाचवण्यासाठी कार्य करत आहे. मागील चार वर्षात वारंवार तक्रारी व आंदोलने करूनही सातपुड्याच्या वनांचा ऱ्हास थांबत नसून उलट तो वाढतच आहे.

जळगाव (जि. बुलडाणा) : सातपुड्यातील वन संपत्तीचे सनवर्धन करणे हे वनविभागासह परिसरातील नागरिकांची पण जबाबदारी आहे. वनीकरण व वृक्ष संवर्धनाच्या कार्यात सूनगाव ग्रामस्थांचे मोठे योगदान आहे. सातपुडाचे संरक्षण व संवर्धनासाठी वनविभाग कटिबद्ध असून, वनसंपदेला नुकसान पोहचविणाऱ्या वन विभागाच्या कर्मचाऱ्यांवर कार्यवाही करण्याचे आश्वासन उप वनसंरक्षक माळी यांनी दिले. तालुक्यातील सूनगाव ग्रामपंचायात भवनमध्ये सातपुडा बचाव समितीच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

हेही वाचा- अकोल्यातील ‘तो’ दुसरा कोरोना संशयित वाशीमचा

गावकऱ्यांनी केल्या आहेत तक्रारी
याबाबत प्राप्त माहिती नुसार, सकाळी नऊ वाजता जिल्ह्याचे डीएफओ माळी हे आपल्या वनविभागाच्या ताफ्यासह ग्रामपंचायत कार्यालयात येथील नागरिक व सातपुडा बचाव समिती सदस्यांशी चर्चा करण्यासाठी आले. मागील चार वर्षांपासून सूनगावचे पर्यावरण प्रेमी नागरिक व लोकप्रतिनिधी एकत्र येत सातपुडा बचाव समिती नावाने सातपुड्यातील उंबरदेव ते कुवरदेव हा अतिमहत्त्वाच्या अंदाजे 40 बाय 55 किमी. आकाराचे संपन्न वन वाचवण्यासाठी कार्य करत आहे. मागील चार वर्षात वारंवार तक्रारी व आंदोलने करूनही सातपुड्याच्या वनांचा ऱ्हास थांबत नसून उलट तो वाढतच आहे. याविषयी व नुकत्याच झालेल्या 33 कोटी वृक्षलागवडमधील हलगर्जीपणा तसेच सुकलेले रोपे याविषयीसुद्धा गावकऱ्यांनी तक्रारी केल्या आहेत. प्रत्येक तक्रार ही ग्रामसभेच्या ठरावाने व सातपुडा बचाव समितींनी संयुक्तिकरित्या दिलेल्या आहेत. प्रभारी वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांची सर्वाधिक सेवा या परिसरातच गेल्याने अवैध सागवान व्यापारी व गोंद तस्करांशी त्यांचे निकटचे संबंध आहेत. त्यामुळे ते स्वतः व इतर वन कर्मचारी सागवान व गोंद तस्करांवर कार्यवाही करीत नाहीत.

क्लिक करा- बुलडाणेकरांनी सोडला सुटकेचा श्‍वास; तो रुग्ण निगेटिव्ह

कर्मचाऱ्यांवर होणार कारवाई
म्हणून जिवाचे रान करून वन संपत्ती वाचविणारे बचाव समिती सदस्य उदासीन होतात. अशा तक्रारीनंतर अशा कर्मचाऱ्यांवर कठोर कार्यवाहीची ग्वाही उप वनसंरक्षक माळी यांनी उपस्थितांना दिली. वनकर्मचारी दोषीही आढळले तरी त्यांना फक्त लेखी समज देण्यापलीकडे कोणतीही कारवाई झाली नाही. याविषयी जाब विचारायला समिती सदस्य व गावकरी लोकप्रतिनिधींसोबत बुलडाणा वन कार्यलयात गेले. तेव्हा त्यांच्या तक्रारीला प्रतिसाद म्हणून स्वतः जिल्हा वन अधिकारी माळी आपल्या कर्मचाऱ्यासहित सूनगाव गाठले. अतिशय पोटतिडकीने व कर्मचाऱ्यांसमोर पुराव्यानिशी आलेल्या सर्व तक्रारी ऐकून स्वतः डीएफओ आपल्या वनविभागाच्या कामकाजपद्धती पाहून स्तब्ध झाले. यावेळी लवकरच वनसंरक्षण समितीचे गठन करण्यात येऊन जंगलातील गस्त आणखी वाढवण्यात येणार असल्याचे माळी यांनी सांगितले. यावेळी अरुण धुळे, महादेवराव धुर्डे, पुंडलिक पाटील, प्रवीण धर्मे, आश्विन राजपूत, अनिल भगत, गजानन सोनटक्के, शिवदास सोनोने, पांडुरंग ताडे, रुपेशसिंह राजपूत, चौधरी, सातपुडा बचाव समितीचे सदस्य, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mali said; Satpuda To save Forest Department CutTied!