चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्याला चोपले

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 जुलै 2019

धारणी (जि. अमरावती) : येथून 50 किमी अंतरावर असलेल्या राणीगावात एका 30 वर्षीय व्यक्‍तीने 6 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार केल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी त्याला पकडून बांधले व चांगलाच चोप दिल्यावर पोलिसांच्या स्वाधीन केले.

धारणी (जि. अमरावती) : येथून 50 किमी अंतरावर असलेल्या राणीगावात एका 30 वर्षीय व्यक्‍तीने 6 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार केल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी त्याला पकडून बांधले व चांगलाच चोप दिल्यावर पोलिसांच्या स्वाधीन केले.
राणीगाव येथे एक 6 वर्षीय चिमुकली सायंकाळी पाच वाजताच्यादरम्यान तिच्या घरासमोरील अंगणात मैत्रिणीसोबत खेळत होती. त्यावेळी मन्साराम परसराम भिलावेकर (वय 30) हा चिमुकलीजवळ गेला. तिला त्याने खाऊ देतो म्हणून फूस लावून त्याच्या राहत्या घरी सोबत नेले. तेथे गेल्यानंतर त्याने चिमुकलीशी बळजबरी केली. या घटनेनंतर ती चिमुकली घरी रडत बसली होती. तिचे आई-वडील शेतातून सायंकाळी सहा वाजतानंतर घरी पोहोचल्यावर तिने घडलेल्या घटनेची माहिती त्यांना दिली. आई-वडिलांनी गावातील पोलिस पाटील व नातेवाइकांशी तत्काळ संपर्क साधला व त्यांना घेऊन आरोपीच्या घरी धडक दिली. आरोपीला पोलिस पाटलांनी व नातेवाइकांनी विचारले असता त्याने शिवीगाळ करीत तेथून पळ काढला. दरम्यान, जमलेल्या गावकऱ्यांनी त्याचा पाठलाग करून त्याला पकडले व चांगलाच चोप दिला. त्यानंतर त्याला बांधून ठेवण्यात आले. रात्री 9 वाजता पोलिस पाटलांनी पोलिस निरीक्षकांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेऊन भिलावेकरला अटक केली. चिमुकलीच्या आईच्या फिर्यादीवरून पोलिसांनी विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: man beaten by citizens for molesting minor girl