क्षुल्लक कारणातून मित्रानेच केली मित्राची हत्या; वर्धेच्या पुलगावमधील घटना  

प्रवीण फुसाट
Sunday, 20 September 2020

घटनेच्या पूर्वी हे दोघे अमरावतीला सोबत गेले. तेथून रात्री परत आले. सकाळी नित्याप्रमाणे कामावर जाण्यासाठी राजेश हा सागरच्या घरासमोर गेला. येथे त्याला आवाज दिला. तो घराबाहेर आला नसल्याने हा आत गेला.

पुलगाव (जि.वर्धा) : नेहमीच सोबत राहणाऱ्या मित्रात क्षुल्लक कारणातून वाद झाला. या वादात एकाने तीक्ष्ण शस्त्राने गळा चिरून दुसऱ्याचा खून केल्याची घटना येथील हरिराम नगरात शनिवारी (ता. 19) सकाळच्या सुमारास घडली. राजेश ऊर्फ बाबू गणेश गुप्ता (वय 27) रा. हरिरामनगर असे मृताचे तर सागर शंकर कांबळे (वय 25) रा. हरिरामनगर असे आरोपीचे नाव असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

घटनेच्या पूर्वी हे दोघे अमरावतीला सोबत गेले. तेथून रात्री परत आले. सकाळी नित्याप्रमाणे कामावर जाण्यासाठी राजेश हा सागरच्या घरासमोर गेला. येथे त्याला आवाज दिला. तो घराबाहेर आला नसल्याने हा आत गेला. यावेळी नेमके काय झाले हे कळण्यापूर्वीच सागरने धारदार शस्त्राने राजेशवर सपासप वार केले. यात रक्‍ताच्या थारोळ्यात पडून त्याचा मृत्यू झाला. यावेळी नागरिकांची गर्दी होताच सागरने घटनास्थळावरून पळ काढला. पोलिसांनी त्याला रात्री उशिरा ताब्यात घेतले.

हेही वाचा - ही लक्षणं देतात शरीरातील कमी ऑक्सिजनची पूर्वसूचना; हे उपाय करा आणि मिळवा नैसर्गिक ऑक्सिजन

घटनेची माहिती पुलगाव पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठले. उपविभागीय पोलिस अधिकारी तृप्ती जाधव, पोलिस निरीक्षक रवींद्र गायकवाड, गुन्हे अन्वेषण पथकाचे प्रमुख राजेंद्र हाडके, विवेक बनसोड, अनिल भोवरे, प्रदीप सहकाटे, पंकज टाकोने, संजय पटले आणि पोलिस घटनास्थळी दाखल झाले. क्षणाचाही विलंब न लावता पोलिस पथकांनी खुनातील आरोपी सागर शंकर कांबळे रा. हरिरामनगर पुलगाव याला ताब्यात घेतले. 

आरोपीने पोलिसांना खुनाची कबुली दिली असून खुनाच्या घटनेत आरोपीने वापरलेले शस्त्र घराशेजारी असलेल्या नाल्यात फेकल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. पुलगाव पोलिसांनी सागर कांबळे याच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा नोंद केला आहे. मृत राजेश गणेश गुप्ता याचा मृतदेह शवविच्छेदन करण्याकरिता पुलगावच्या ग्रामीण रुग्णालयात रवाना करण्यात आले आहे.

सविस्तर वाचा - ते लांब बसून रडत होते; काही नागरिक बघून निघून गेले, पडाटे आले सत्य समोर

मित्राकडून हत्येची दुसरी घटना

मित्रांत झालेल्या वादात एका मित्राने दुसऱ्याचा खून केल्याची ही दोन दिवसातील दुसरी घटना आहे. गुरुवारी वर्धमनेरी येथे कुऱ्हाड चोरीच्या वादातून मित्रानेच मित्राचा खून केला. ते प्रकरण शांत होते न होते ते पुलगाव येथे मित्रानेच दुसऱ्या मित्राचा खून केला.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: man ended his friends life in wardha district