"माझी एका मोठ्या अधिकाऱ्याशी ओळख आहे" असं म्हणत कथित महाराजानं 40 बेरोजगारांना घातला गंडा 

Man looted 40 unemployed people on name of government jobs
Man looted 40 unemployed people on name of government jobs

अमरावती ः दोघांना नोकरीचे आणि मित्राला शेताचा वाढीव मोबदला मिळवून देण्याचे आमिष दाखवून 17 लाख लुबाडणाऱ्या कथित महाराजाने एक किंवा दोन नव्हे तर तब्बल चाळीसपेक्षा अधिक लोकांची आर्थिक लुबाडणूक केली. ही धक्कादायक माहिती शहर कोतवाली पोलिसांच्या प्राथमिक तपासातून पुढे आली.

महेश नारायण जोशी (रा. गणपतीनगर, शेगाव), असे अटक व्यक्तीचे नाव असून, त्याला जिल्हा न्यायालयाने सोमवारपर्यंत (ता. 22) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. कोतवाली पोलिसांनी बुधवारी (ता. 10) जोशीसह त्याचा साथीदार श्रावण दशरथ चौधरी (रा. कमीशनर कॉलनी) या दोघांविरुद्ध नरेंद्र गोपाल बरडे (वय 22, रा. अप्परवर्धा वसाहत) या युवकाच्या तक्रारीवरून फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. 

नरेंद्र बरडे व त्याच्या वहिनीला चांगल्या पदावर शासकीय नोकरी लावून देण्याचे आमिष दाखविले होते. त्यासाठी बरडे यांच्याकडून सात लाख रुपये जोशी यांनी घेतले. तर नरेंद्रचा मित्र दीपक सहदेव चव्हाण (रा. नवसारी, अमरावती) यांना त्याच्या शेतीचा वाढीव मोबदला मिळवून देण्याचेही आमिष जोशी व चौधरी यांनी दाखविले. त्या मोबदल्यात चव्हाणकडून दहा लाख, असे एकूण 17 लाख रुपये दोघांकडून लुबाडले. परंतु शासकीय नोकरी बरेच दिवस लोटूनही लागली नाही किंवा शेतीचा मोबदलासुद्धा मिळाला नाही.

त्यामुळे बरडे यांनी शहर कोतवाली ठाण्यात तक्रार दाखल केल्याने जोशी व चौधरीविरुद्ध गुन्हा दाखल झाला. सर्वच रक्कम जोशी याच्या बॅंकखात्यात जमा झाली, हे विशेष. जोशी हे पूजा करून स्वत:चा उदरनिर्वाह भागवितात. आपली मोठ्या अधिकाऱ्यांसोबत ओळख असल्याचा दावा करून त्यांनी अनेक बेरोजगारांना नोकरीचे आमिष दाखवून लाखो रुपये लुबाडले. असे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले.

सद्य:स्थितीत याप्रकरणात केवळ दोघांनीच तक्रारी केल्या आहेत. परंतु प्रत्यक्षात फसवणूक झालेल्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे ज्यांनी जोशी यास पैसे दिले आहेत, अशांनी पोलिसांकडे तक्रार नोंदवावी.
-सुदाम आसोरे, 
उपनिरीक्षक, शहर कोतवाली.

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com