'व्यवस्थेशी लढताना रत्नहाराची अपेक्षा नाही''

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 जून 2018

नागपूर - सध्याची शासनव्यवस्था ही शोषकाची प्रतीक असून, या व्यवस्थेकडून मला रत्नहाराची अपेक्षा नाही, असे परखड मत ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे यांनी व्यक्त केले. डॉ. साळुंखे यांचा नागरी सत्कार आज नागपुरात करण्यात आला. या वेळी बोलताना त्यांनी केंद्र व राज्य सरकारवर टीका केली. या वेळी अनेक वक्‍त्यांनी डॉ. साळुंखे यांना "महाराष्ट्रभूषण' तसेच "भारतरत्न' देण्याची मागणी केली. यापूर्वी धर्मशास्त्राचे गाढे अभ्यासक पां. वा. काणे यांना केंद्र सरकारने भारतरत्न देऊन गौरविले होते. हा धागा पकडून डॉ. साळुंखे म्हणाले, 'सध्याची शासनव्यवस्था ही शोषकाची शासन व्यवस्था आहे. दलित, आदिवासी, ओबीसी, अल्पसंख्याक व महिलांवर सातत्याने अत्याचार वाढत आहेत. या शोषक व्यवस्थेच्या विरोधात मी लढा देत आहे. हा लढा सुरूच राहणार आहे. ज्या व्यवस्थेच्या विरोधात मी लढा देत आहे, त्याच व्यवस्थेने माझा गौरव करावा, अशी अपेक्षा मी ठेवू शकणार नाही. मला मान-सन्मानाची कोणतीही अपेक्षा नाही.''

मला अमुक अमुक पुरस्कार द्यावा, अशी कुणीही मागणी करू नये, असेच निर्देश मी आयोजकांना दिले होते. तरीही काहींनी माझ्या प्रेमापोटी पुरस्कार देण्याची मागणी केली आहे. याबद्दल आभार व्यक्त करून डॉ. साळुंखे म्हणाले, की संशोधन हाच माझा पिंड आहे. माझा संशोधन व अभ्यास सुरू राहणार आहे.

Web Title: management a. h. salunkhe