मणप्पुरमचे आरोपी अद्याप पसारच

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 सप्टेंबर 2016

नागपूर - मणप्पुरम गोल्ड लोन बॅंकेच्या जरीपटक्‍यातील शाखेत दरोडा टाकून साडेनऊ कोटींचे दागिने लंपास करणारे दरोडेखोर अद्याप फरार आहेत. या प्रकरणात पोलिसांच्या हाती कोणताही धागा लागला नाही. मात्र, गुन्हे शाखेने परराज्यासह वेगवेगळ्या ठिकाणी पथके रवाना केली.

नागपूर - मणप्पुरम गोल्ड लोन बॅंकेच्या जरीपटक्‍यातील शाखेत दरोडा टाकून साडेनऊ कोटींचे दागिने लंपास करणारे दरोडेखोर अद्याप फरार आहेत. या प्रकरणात पोलिसांच्या हाती कोणताही धागा लागला नाही. मात्र, गुन्हे शाखेने परराज्यासह वेगवेगळ्या ठिकाणी पथके रवाना केली.

बुधवारी दुपारी चारच्या सुमारास जरीपटक्‍यातील नारी रोडवर भीमचौकात असलेल्या मणप्पुरम बॅंकेत पिस्तुलधारी पाच दरोडेखोर घुसले. त्यांनी बॅंक कर्मचारी संध्या शेंडे यांच्या कानशिलाला पिस्तूल लावून आत प्रवेश केला. त्यानंतर बॅंकेचे व्यवस्थापक नंदकिशोर नाखले (वय ३०, झिंगाबाई टाकळी) यांच्या कपाळावर पिस्तूल लावून लॉकर उघडण्यास सांगितले. यावेळी बॅंकेत उपस्थित एका महिलेसह पाच ग्राहकांचे मोबाईल हिसकावून जीवे मारण्याची धमकी दिली. बॅंकेच्या स्ट्राँगरूममधील ३० किलो सोन्याचे दागिने आणि तीन लाख रुपये रोख असा एकूण साडेनऊ कोटी रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. हा नागपुरातील सर्वांत मोठा दरोडा असून, नागपूर पोलिसांना नवे आव्हान आहे. पाचही आरोपी दोन दुचाक्‍यांनी सोन्यासह पळून गेले. शहरात साडेसात हजार पोलिसांचा ताफा सुरक्षेसाठी तैनात असूनही पोलिसांच्या हाती अद्याप ठोस असे काहीही लागले नाही. गुन्हे शाखेची पथके आरोपींच्या शोधासाठी वेगवेगळ्या ठिकाणी रवाना झाले आहेत. पोलिसांना बॅंकेतून सीसीटीव्हीचे फुटेज मिळाले आहेत. त्यामधून आरोपींचे फोटो काढून प्रसारमाध्यमांद्वारे प्रकाशित करण्यात आले. गुन्हे शाखेत असलेल्या गुन्हेगारांच्या फोटोशी जुळवाजुळव करूनसुद्धा पाहण्यात आले. मात्र, आरोपी राज्याबाहेरील असल्याचे निष्पन्न झाले. 

दरोडेखोराने परत केले महिलेचे दागिने
बॅंकेत दरोडा टाकण्यासाठी पाच दरोडेखोर घुसले. त्यांनी ३० किलो सोन्याचे दागिने लुटले. तर एका दरोडेखोराने बॅंकेत सोने गहाण ठेवून पैसे काढण्यासाठी आलेल्या महिलेच्या हातातील सोने लुटले. त्या महिलेने दरोडेखोरांना सोने परत करण्याची विनंती केली. ‘माझ्या कुटुंबातील सदस्य खूप आजारी आहे. त्याच्या उपचारासाठी सोने गहाण ठेवणार होते. हॉस्पिटलमध्ये पैसे न भरल्यास तो उपचाराअभावी मरू शकतो. त्यामुळे दागिने परत करा.’ अशी विनंती केली. त्यावेळी एका दरोडेखोराला किव आली आणि त्याने महिलेचे सोने परत करून पळ काढला. 

सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा बॉक्‍स फेकला
दरोडेखोरांनी बॅंकेत लूटमार केली. हा दरोडा बॅंकेतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. ही बाब हेरून एका दरोडेखोराने कॅमेऱ्याची बॉक्‍स-हार्डडिस्क काढून घेतली. त्यांच्याकडे असलेल्या दोन्ही थैल्या दागिन्यांनी भरलेल्या होत्या. वजन जास्त झाल्यामुळे दरोडेखोरांनी हार्डडिस्क बॅंकेतच फेकून दिली.

Web Title: Manappuram the accused absconding

टॅग्स