बजेरियातील हॉटेलमध्ये थांबले होते आरोपी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 मार्च 2017

नागपूर - जरीपटक्‍यातील मणप्पुरम गोल्ड फायनान्स बॅंकेवर दरोडा टाकण्यापूर्वी कुख्यात दरोडेखोर सुबोधसिंग आणि त्याच्या साथीदारांनी बजेरियातील एका अलेशान हॉटेलमध्ये १५ दिवस मुक्‍काम केला होता. येथूनच दरोडेखोरांनी बॅंक लुटून ३१ किलो सोने आणि लाखोंच्या रक्‍कमेवर डल्ला कसा मारायचा, याचे नियोजन केले होते. 

नागपूर - जरीपटक्‍यातील मणप्पुरम गोल्ड फायनान्स बॅंकेवर दरोडा टाकण्यापूर्वी कुख्यात दरोडेखोर सुबोधसिंग आणि त्याच्या साथीदारांनी बजेरियातील एका अलेशान हॉटेलमध्ये १५ दिवस मुक्‍काम केला होता. येथूनच दरोडेखोरांनी बॅंक लुटून ३१ किलो सोने आणि लाखोंच्या रक्‍कमेवर डल्ला कसा मारायचा, याचे नियोजन केले होते. 

मणप्पुरम गोल्ड फायनान्स दरोडा प्रकरणात जरीपटका पोलिसांनी सूरजकुमार सिंह आणि मुकेश ऊर्फ धर्मवीर बाबासिंह यांना पश्‍चिम बंगालवरून अटक केली. दोन्ही दरोडेखोर १ मार्चपर्यंत पोलिस कोठडीत आहेत. जरीपटका पोलिसांनी बजेरियातील त्या हॉटेलमध्ये हजेरी रजिस्टर आणि बिलबूक जप्त केले. मुख्य आरोपी सुबोध सिंग (नालंदा, बिहार) आणि त्याचे काही साथीदार अद्याप पोलिसांच्या हाती लागले नाहीत. नागपुरात दरोडा घातल्यानंतर सर्व आरोपी नालंदा येथे गेले होते. तेथे सर्वांनी हिस्सेवाटणी केल्यानंतर सर्व जण नेपाळला निघून गेले. तेथे एका अलिशान हॉटेलमध्ये २५ दिवस थांबल्यानंतर आपापल्या मार्गाने पळ काढला होता. ३१ किलो सोने आणि रक्‍कम कुठे आहे? याबाबत पोलिस काहीही माहिती काढू शकले नाही. सुबोध सिंहची पत्नी जान्हवी ही सध्या नागपूर मध्यवर्ती कारागृहात बंद आहे. तिला दोन महिन्यांपूर्वीच जरीपटका पोलिसांनी बिहारमधून अटक केली होती.

विशाखापट्टणममधून दरोडेखोरांना अटक
देशातील मोठमोठ्या दरोड्याचा मास्टरमाइंड सुबोध सिंह याने पश्‍चिम बंगालमधील बारागल शहरातील २७ लाख रुपयांचा दरोडा घातला होता. तेथून सर्व आरोपी दक्षिण भारताकडे रवाना झाले होते. आरोपी मुकेश सिंह आणि बाबा सिंह हे दोघे विशाखापट्टणम शहरातील एका हॉटेलमध्ये लपून बसले होते. पश्‍चिम बंगाल पोलिसांनी छापा घालून दोघांनाही अटक केली. त्यांनी पीसीआरमध्ये चोरीची कबुली दिली. त्यानंतर नागपूरमधील मणप्पुरम बॅंकेवर दरोडा घातल्याची धक्‍कादायक माहिती दिली. तेथील पोलिसांनी नागपूर आयुक्‍तालयाशी संपर्क करून दोन्ही दरोडेखोरांना नागपूर पोलिसांच्या हवाली केले.

मोमिनपुऱ्यातून दुचाकी 
मणप्पुरम बॅंकेवर दरोडा टाकण्यासाठी शहरातील रस्ते आणि दैनंदिन माहिती घेण्यासाठी दुचाकींची गरज होती. मास्टरमाइंड सुबोध सिंह, सूरजकुमार सिंह, मनीष सिंह, मिथिलेश सिंह, रोशन सिंह, मुकेश सिंह यांनी मुक्‍कामासाठी बजेरियातील एका हॉटेलची निवड केली. तेथून मोमिनपुऱ्यात जाऊन ओळखी वाढविण्यास सुरुवात केली. मोमिनपुऱ्यातील एका खान नावाच्या व्यक्‍तीकडून सेकंड हॅंड दोन पल्सर विकत घेतल्या. सतत सात दिवस दुचाकींनी मणप्पुरम बॅंक ते शहराबाहेर जाणाऱ्या रस्त्यांची रेकी केली. त्यानंतर दोन्ही दुचाकींवर सहा जण जाऊन बॅंकेवर दरोडा घातला आणि दुचाकीने पळ काढला. शहराबाहेर जाताच त्यांनी दुचाकी फेकून दिल्या आणि सरळ नालंदा (बिहार) गाठले.

Web Title: Manappurama Gold Finance robbery case