
प्रियांका-मनीष या नवदाम्पत्यावर मंगल अक्षता उधळल्या तर आमले दाम्पत्यावर उपस्थित मंडळींनी कौतुकाचा वर्षाव केला. मानस कन्या प्रियांकाला निरोप देताना मात्र रवींद्र व अंजली यांचे कन्या विरहाने डोळे पाणावले.
पुसद (जि. यवतमाळ) : माणुसकी हरवली आहे, अशी सगळीकडे हाकाटी होत असताना समाजात माणूसपण जिवंत आहे, याचा प्रत्यय पुसद येथील एका लग्न प्रसंगात आला. मुलगी म्हणजे ओझे, ही भ्रामक संकल्पना वधू पित्याने मानस कन्येचे कन्यादान करून मोडीत काढली. पुसद येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक रवींद्र व अंजली आमले या दाम्पत्याने मानसकन्या प्रियांका व मनीष या नवपरिणीत जोडप्यावर आशीर्वादाच्या अक्षदा उधळल्या.
माहूर तालुक्यातील लखमापूर तांडा येथील प्रियांका ही नागोराव व छाया राठोड या कष्टकऱ्यांची एकुलती एक मुलगी. लहानपणापासूनच चुणचुणीत. घरची आर्थिक स्थिती कठीण असतानाही तिने माहूरला दहावीचे शिक्षण पूर्ण केले. पुढील डी.एड. शिक्षणासाठी ती २०१० मध्ये पुसदला आली. कोषटवार शाळेतील मुख्याध्यापक रवींद्र आमले यांनी तिला घरी आधार देत मानसकन्या मानले.
अधिक माहितीसाठी - वाढदिवसाला नातेवाईक बसले जेवायला; बॉक्स उघडताच सरकली पायाखालची जमीन
तिच्या शिक्षणाची जबाबदारी सांभाळली. डी.एड. नंतर कला स्नातक ही पदवी तिने यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून पूर्ण केली. स्वतः रवींद्र आमले यांनी इंग्रजी साहित्याचा अभ्यास करून तिला घरी शिकवले. या दरम्यान चित्रकला, टंकलेखन परीक्षा तिने गुणवत्तेसह उत्तीर्ण केल्या.
बंजारा तांड्यावरील तिच्या आई-वडिलांना प्रियंकाचे हात पिवळे करावे, असे वाटत असतानाच रवींद्र आमले यांनी आपली मानस कन्या स्वतःच्या पायावर उभी राहावी, अशी इच्छा व्यक्त केली. त्यांचा मुलगा अनिरुद्ध व सून नयना हे पुणे येथे असल्याने योग जुळून आला. त्यांच्याकडे थांबून प्रियंकाने शासकीय आयटीआय प्रशिक्षण घेतले. तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाचा ब्युटीशियनचा अभ्यासक्रम पूर्ण केला व स्वतःच्या पायावर उभे राहण्याचे स्वप्न साकारले.
मानस कन्या म्हणून प्रियांका घरी आली तेव्हा तिला मराठी भाषेचे उच्चारण कठीण जात होते. मात्र, पुण्याच्या वातावरणात ती अस्खलित पुणेरी मराठी बोलू लागली. तिच्या व्यक्तिमत्त्वातील बदल पाहताना आमले दांपत्य हरखून गेले. त्यांनी प्रियांकासाठी तिच्या स्वप्नातील जादूगर शोधणे सुरू केले. मूळ नागपूर येथील मनीष मधुकर गुज्जेवार हा एमबीए झालेला तरुण उपवर मुलगा प्रियांकासाठी जोडीदार म्हणून आमले दाम्पत्यांनी निवडला.
तो मुंबई येथे एका कंपनीत नोकरी करतो. प्रियंकालाही तो आवडला आणि ऋणानुबंधाच्या रेशीम गाठी जुळून आल्या. प्रियांकाचे आई-वडील, मामा-मामी यांच्यासह मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत वैदिक पद्धतीने हा मंगल सोहळा पार पडला. प्रियांका-मनीष या नवदाम्पत्यावर मंगल अक्षता उधळल्या तर आमले दाम्पत्यावर उपस्थित मंडळींनी कौतुकाचा वर्षाव केला. मानस कन्या प्रियांकाला निरोप देताना मात्र रवींद्र व अंजली यांचे कन्या विरहाने डोळे पाणावले.
जाणून घ्या - Success Story : आईने अंगावरील सोनं गहाण ठेवून शिकवले पोरीला अन् तिने कमालच केली
‘प्रियांका आमले' अशीच तिची ओळख होती
प्रियांका अतिशय हुशार व हरहुन्नरी आहे. ती प्रेमळ असून माझे व अंजलीचे मन जिंकले. माझी मुलगी अमृता एवढेच प्रियांकाला आम्ही सांभाळले. समाजात वावरताना ‘प्रियांका आमले' अशीच तिची ओळख होती. तिचे हात पिवळे करताना खूप आनंद झाला. समाजाने हा आदर्श घेतला तर पुण्य फळाला आल्यासारखे होईल.
- रवींद्र आमले,
पालक, पुसद
संपादन - नीलेश डाखोरे