मंगलाष्टके, अक्षता पडल्या पोलिस ठाण्यात

 पांढरकवडा : येशुदास व रॉयलच्या लग्नात दोघांचे आईवडील व वऱ्हाडी.
पांढरकवडा : येशुदास व रॉयलच्या लग्नात दोघांचे आईवडील व वऱ्हाडी.

झरी जामणी (जि. यवतमाळ) : पोलिसाचे नाव येताच सर्वसामान्यांच्या मनात धडकी भरते. पोलिसांची प्रतिमा जनतेच्या मनात तितकीशी चांगली नाही. मात्र, पांढरकवडा पोलिसांचे सामाजिक रूप पाहायला मिळाले. जवळपास मोडलेले लग्न पोलिसांनी परत जुळवून आणले. झरी तालुक्‍यातील कोलाम समाजाचे शिबला येथील कुबकु कुमरे यांचे चिरंजीव येशुदास व पांढरकवडा तालुक्‍यातील ढोकी (वाई) येथील हरिभाऊ आत्राम यांची कन्या रॉयल या दोन्ही परिवारात एका वर्षापूर्वी आत्या घरी भाची देण्याचे ठरले. "प्यार किया तो डरना क्‍या' या युक्तीतून यशुदास व रॉयलची जवळीकता वाढली. परंतु, काही दिवसांतच या दोघांत पटत नसल्यामुळे हे नाते तुटण्याच्या मार्गावर आले. मुलीच्या वडिलांची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. लग्न मोडले तर मुलीचे काय होणार, या भीतीने त्यांची चिंता वाढली. त्यानंतर मुलीकडील कुटुंब शिबला येथे मुलाच्या घरी बैठक घेऊन बसले. त्यामुळे दोन्ही कुटुंबांत वितुष्ट निर्माण झाले. यानंतर मुलीचे वडील सोमवारी (ता. 24) पांढरकवडा पोलिसांत पोहोचले. पोलिसांनी व वाई येथील मुख्याध्यापक अशोक चौधरी यांनी तरुण, तरुणीसह त्यांच्या कुटुंबाची समजूत काढली. अखेर नवरदेव तयार झाला. पोलिस ठाण्यातच विवाहाचा विधी उरकण्याची तयारी सुरू झाली. या कार्यास लागणारा सर्व खर्च मुलामुलींना कपडे, मंगळसूत्र, जोडवे, हारतुरे, मिठाई व अल्पोपहारचा खर्च उत्तरदायित्व म्हणून अशोक चौधरी यांच्यावतीने करण्यात आला. शेवटी सर्वांच्या साक्षीने मुलीचा पोलिस ठाण्यात विवाह सोहळा सुरू झाला. मंगलाष्टके झाली, फुलांच्या अक्षता पडल्या, दोघांनी एकमेकांच्या गळ्यात माळ टाकली. हा अविस्मरणीय प्रसंग पांढरकवडा पोलिस ठाण्यात पार पडला. जमादार संजय गायकवाड, पोलिस कर्मचारी व वऱ्हाडांच्या साक्षीने वधू-वर लग्नाच्या पवित्र बंधनात अडकले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com