मॅंगनीज कंपनीची ५० लाखांनी फसवणूक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 नोव्हेंबर 2018

नागपूर - सदर येथील मॅंगनीज कंपनीच्या कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने मित्र आणि भावाच्या मदतीने अबकारी शुल्कापोटी असलेली ३६ देयके न भरता परस्पर ५० लाख ६८ हजारांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल करून अटक केली.

नागपूर - सदर येथील मॅंगनीज कंपनीच्या कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने मित्र आणि भावाच्या मदतीने अबकारी शुल्कापोटी असलेली ३६ देयके न भरता परस्पर ५० लाख ६८ हजारांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल करून अटक केली.

मंगेश रघुनाथ थाटे (वय ४२), भाऊ मुकेश रघुनाथ थाटे (रा. विठ्ठलवाडी, हुडकेश्वर) आणि रोहित रेवतकर (रा. ओमनगर रनाळा कामठी रोड) अशी आरोपींची नावे आहेत. सदर परिसरात असलेल्या एनएडीटी बिल्डिंगसमोर असलेल्या गुडअर्थ एग्रोचेम प्रा. लि. या मॅंगनीज कंपनीचे कार्यालय आहे. गुप्तराज पाटील (रा. जुनी मंगळवारी) हे या कंपनीचे संचालक आहेत. २५ वर्ष जुने असलेल्या कार्यालयात मंगेश थोटे कर्मचारी आहे. त्याला ९ नोव्हेंबर २०१६ ते पाच ऑक्‍टोबर २०१८ पर्यंत कंपनीचे ५० लाख ६८ हजार १८० रुपयांचे ३६ रिबिट बिल अबकारी विभागात जमा करण्यास सांगितले होते.

मात्र, त्याने कुठलेच बिल सादर केले नाही. चोरी पकडल्या जाईल, हे निदर्शनास येताच, त्याने भाऊ मुकेश रघुनाथ थाटे आणि रोहित रेवतकर याच्या मदतीने विभागाच्या अतिरिक्त आयुक्तांच्या खोट्या स्वाक्षऱ्या असलेले कागदपत्रही तयार करून त्यावर बनावट सीलही लावण्यात आले. ही बाब संचालकांच्या लक्षात येताच, त्यांनी अबकारी विभागाशी संपर्क साधला.

या प्रकरणी त्यांनी सदर पोलिसांकडे मंगेश थाटे याच्याविरुद्ध तक्रार नोंदविली. पोलिसांनी प्रकरणाची चौकशी करून मंगेशला ताब्यात घेतले. त्याने या कामात मुकेश आणि रोहितही सहभागी असल्याची कबुली दिली. दरम्यान, तिघांनाही जिल्हा सत्र न्यायालयासमोर सादर केले. यावेळी न्यायालयाने त्यांची एका दिवसाच्या पोलिस कोठडीत रवानगी केली.

Web Title: Manganese company frauds up to 50 lakhs