मानकापूर क्रीडासंकुलात थाटला बार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 जुलै 2018

नागपूर - मानकापूरच्या क्रीडासंकुलात आयोजित काही खासगी सोहळ्यांमध्ये बार थाटून दारू उपलब्ध करून देण्यात आली होती, असा दावा न्यायालयीन मित्र ॲड. श्रीरंग भांडारकर  यांनी केला आहे. यासंदर्भात दोन आठवड्यांत स्पष्टीकरण सादर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

नागपूर - मानकापूरच्या क्रीडासंकुलात आयोजित काही खासगी सोहळ्यांमध्ये बार थाटून दारू उपलब्ध करून देण्यात आली होती, असा दावा न्यायालयीन मित्र ॲड. श्रीरंग भांडारकर  यांनी केला आहे. यासंदर्भात दोन आठवड्यांत स्पष्टीकरण सादर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

रेशीमबाग मैदान, कस्तुरचंद पार्क व मानकापूर क्रीडासंकुलातील व्यावसायिक वापराला कोण परवानगी देतात, असा सवाल न्यायालयाने यापूर्वीच्या सुनावणीत केला होता. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी शपथपत्र सादर करून आतापर्यंत कधीही लग्नसमारंभांना किंवा कौटुंबिक सोहळ्यांसाठी संकुल दिलेले नाही, असा दावा करून केवळ क्रीडा, सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक कार्यक्रमांनाच संकुल उपलब्ध करून दिल्याचे म्हटले होते. 

त्यामुळे संकुलातील कौटुंबिक सोहळे व खासगी कार्यक्रमांबाबत सविस्तर माहिती न्यायालयात सादर करण्याचे आदेश न्यायालयीन मित्रांना दिले होते. त्यानुसार आज ही माहिती छायाचित्रांच्या पुराव्यासह न्यायालयात सादर करण्यात आली. 

दरम्यान, रेशीमबाग मैदानावर अमर सर्कसचे आयोजन करण्याची परवानगी दादासाहेब धनवटे  नगर विद्यालयाने (डीडीनगर) दिली होती, अशी माहिती नागपूर सुधार प्रन्यासने न्यायालयात सादर केलेल्या शपथपत्रात दिली होती. त्यामुळे विद्यालयाला प्रतिवादी करून अध्यक्ष आणि सचिवांना पुढील सुनावणीसाठी प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश आज न्यायालयाने दिले होते. न्यायालयाच्या आदेशांनुसार डीडीनगर विद्यालयाचे सचिव व मुख्याध्यापक आज सुनावणीला उपस्थित झाले  होते.

संकुलाचा गैरवापर टाळण्याचे आदेश द्यावे  
मानकापूरचे क्रीडासंकुल गरबा कार्यक्रम, खासगी कंपन्यांचे खासगी सोहळे. डिस्को पार्टी आदींसाठी देण्यात आले आहेत. विविध कौटुंबिक सोहळे व लग्नसमारंभांसाठीही त्याचा वापर झाला आहे. यातील काही सोहळ्यांमुळे संकुलातील वस्तूंची मोडतोडही झाली. क्रीडासंकुलाच्या उद्देशाला सुरुंग लावण्याचे काम प्रशासनाने केले, असेही यात नमूद करण्यात आले आहे. विभागीय क्रीडासंकुलाचा गैरवापर टाळून खेळाडूंना लाभ होण्याच्या दृष्टीने पावले उचलण्याचे आदेश प्रशासनाला द्यावे, अशी मागणीही न्यायालयीन मित्रांनी केली आहे.

Web Title: Mankapur Sports Complex Bar Liquor crime