नक्षलवाद्यांकडून 80 वाहनांची जाळपोळ 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 24 डिसेंबर 2016

एटापल्ली (जि. गडचिरोली) - सुरजागड पहाडावरून लोह खनिजाची वाहतूक करणारी 80 वाहने नक्षलवाद्यांनी जाळल्याची घटना शुक्रवारी (ता. 23) सकाळी दहाच्या सुमारास घडली. जाळलेल्या वाहनांमध्ये ट्रक, पोकलॅंड, जेसीबीचा समावेश आहे. 40 पेक्षा अधिक मजूर नक्षलवाद्यांनी केलेल्या मारहाणीत जखमी झाले; तर दोन वाहनचालकांचा आगीत होरपळून मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. 

सुरजागड पहाडावरील लोह खनिज उत्खननाचा परवाना लॉयड मेटल्स कंपनीसह अन्य कंपन्यांनाही मिळाला आहे. यंदाच्या उन्हाळ्यात या कंपन्यांनी उत्खननास प्रारंभ केला. परंतु, स्थानिक आदिवासी व नक्षलवाद्यांनी विरोध केल्यानंतर काही काळासाठी हे काम बंद झाले होते. दिवाळीत पुन्हा उत्खनन करून त्याची वाहतूक सुरू झाली. दरम्यान, स्थानिक आदिवासींच्या विविध संघटनांनी पुन्हा ग्रामसभा घेऊन उत्खननास तीव्र विरोध दर्शविला. गेल्या महिन्यात नक्षलबंदमध्ये माओवाद्यांनी पत्रके टाकून काम बंद करण्याचे फर्मान सोडले होते. मजुरांनाही कामावर येण्यास बंदी घातली होती; परंतु यानंतरही काम सुरू होते. 

शुक्रवारी पहाटे शेकडो नक्षलवाद्यांनी लोह खनिज उत्खनन सुरू असलेल्या ठिकाणी धाबा बोलत वाहनचालक व मजुरांना एका ठिकाणी गोळा करून त्यांना बेदम मारहाण केली. त्यानंतर त्या सर्वांना ओलिस ठेवून आपला मोर्चा वाहनांकडे वळविला. ही वाहने नक्षलवाद्यांनी पेटवून दिल्याने कंपनीचे चार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. सुमारे पाच तास नक्षलवाद्यांचा हैदोस सुरू होता. या वेळी दीडशेच्या वर मजूर पहाडाच्या वरच्या बाजूला होते; हा प्रकार बघून त्यांनी पळ काढल्याने ते बचावले. 

मारहाणीत जखमी झालेल्या मजुरांत नक्षलवाद्यांची प्रचंड दहशत असून त्यांनी स्वतःवर उपचार करून घेण्यास नकार दर्शविला आहे. 

Web Title: Maoists from 80 vehicle arson