गडचिरोली जिल्ह्यात पोलिस-नक्षलवाद्यांत चकमक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 जानेवारी 2017

गडचिरोली - पेंढरी पोस्ट पार्टी व सीआरपीएफ संयुक्तपणे नक्षलवाद्यांविरोधात अभियान राबवत असताना जंगलात दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी पोलिस पथकावर गोळीबार केला. पोलिसांनीही प्रत्युत्तरादाखल गोळीबार सुरू केल्याने नक्षलवादी जंगलात पळून गेले. ही घटना मंगळवारी घडली. नक्षलवाद्यांवर दबाव वाढल्याने त्यांनी आपले साहित्य जागेवरच टाकून पळ काढला. चकमकीनंतर परिसरात शोधमोहीम राबविली असता मोठ्या प्रमाणात नक्षलवाद्यांचे साहित्य आढळून आले. नक्षलवाद्यांचे हे साहित्य पोलिसांनी जप्त केले. गेल्या काही दिवसांपासून एटापल्ली तालुका तसेच लगतच्या भागात नक्षलवाद्यांचा हैदोस वाढला आहे. पोलिस नक्षलवाद्यांच्या विरोधात तीव्र अभियान राबवीत आहेत.

पत्रकात आदिवासी जोहार

एटापल्ली येथील वनतपासणी नाक्‍यालगत बुधवारी सामाजिक कार्यकर्ते सैनू गोटा यांच्या विरोधात बदनामीकारक पत्रके सापडली. गोटा ढोंगी समाजसेवक असून, पोलिसांच्या मदतीने जीवन जगत असल्याचा मजकूर पत्रकात आहे. मजकुराच्या खाली "आदिवासी जोहार' असा उल्लेख आहे. यासंदर्भात गोटा म्हणाले, पत्रकातील आरोप खोटे आहोत. आपण सामाजिक काम करीत असून, बदनाम करण्यासाठी कोणीतरी हा डाव रचला आहे.

Web Title: Maoists in Gadchiroli district-police encounter