मराठा आरक्षणासाठी चांदूररेल्वे कडकडीत बंद

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 ऑगस्ट 2018

आंदोनकर्त्यांकडून विविध मागण्यांचे तहसीलदारांना निवेदन
चांदूररेल्वे : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या प्रमुख मागणीसाठी शहरातील सकल मराठा समाजातर्फे शनिवारी आंदोलन करण्यात आले. यात संपूर्ण चांदूर शहर सायंकाळपर्यंत कडकडीत बंद ठेवण्यात आले होते. याच दरम्यान काही आंदोलनकर्त्यांनी शहरातील गाडगेबाबा मार्केटस्थित दूधडेअरीची तोडफोड करून तेथील 20 हजारांचे नुकसान केल्याची माहिती समोर आली. पेट्रोलपंपसुद्धा बंद ठेवण्यात आल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला.

गेल्या अनेक दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मोर्चे-आंदोलने सुरूच असून आता याला सुरुवात या तालुका शहरातूनही झाली. शहरातील सकल मराठा समाजातर्फे आमदार वीरेंद्र जगताप यांच्या घरासमोर शुक्रवारी (ता. तीन) सकाळी 11 वाजता घंटानाद आंदोलन करण्यात आले; यानंतर आता शनिवारी (ता. चार) चांदूररेल्वे शहरात आंदोलन करण्यात आले. सकाळी 7 पासून ते सायंकाळी 5 पर्यंत हा बंद पाळण्यात आला. यानंतर विरूळ चौकातही चारही बाजूंची वाहतूक अडवून रास्ता रोको केला गेला. ही वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात आली.
विरूळ चौकात गाड्या अडविताना चालकांसोबत आंदोलनकर्त्यांची हुज्जत झाल्याचेही चित्र होते. शिवाजीनगरातून रॅली काढण्यात आली. ती बसस्टॅंड, विरूळ चौक, जुना मोटारस्टॅंड या मार्गे सिनेमा चौक, क्रांती चौक व अमरावती मार्गाने तहसील कार्यालयासमोर पोहोचली. याठिकाणी आंदोलकांनी ठिय्या आंदोलन केले.
रॅलीत चिमुकले, महिला-पुरुष तथा युवक व युवतींनी मोठा सहभाग घेतला होता. आरक्षणाच्या मागणीचे निवेदन तहसीलदार बी. एन. राठोड यांना देण्यात आले. या आंदोलनादरम्यान एसटी बसेस बंद ठेवण्यात आल्या होत्या.
सायंकाळपर्यंत चांदूररेल्वे आगाराची एकही बस बाहेर काढण्यात आलेली नव्हती. आगारात दिवसभर शुकशुकाट होता.
डेअरीमध्ये तोडफोड
चांदूररेल्वे शहरवासी गाडगेबाबा मार्केटमधील सैय्यद आसिफ सैय्यद सादिक यांच्या मालकीचे रघुवीर दूधडेअरीचे अंदाजे 25-30 आंदोलकांनी नुकसान केले. तसेच डेअरीसमोर उभे असलेले सैयद आसिफ यांच्या तीनचाकी गाडीचे समोरील काचसुद्धा फोडण्यात आले. याची तक्रार चांदूररेल्वे पोलिस ठाण्यात देण्यात आली. एकूण 20 हजारांचे नुकसान झाल्याचे सैयद आसिफ यांनी तक्रारीत नमूद केले.
 
Web Title: maratha andolan news chandurrailway