Maratha reservation is still pending students waiting for admission
Maratha reservation is still pending students waiting for admission

मराठा आरक्षणाचा तिढा सुटता सुटेना; अकरावीचे प्रवेश रखडलेलेच

अमरावती ः मराठा आरक्षणाची सुनावणी पुन्हा चार आठवड्यांनी पुढे ढकलल्या गेल्याने इयत्ता अकरावीची प्रवेशप्रक्रिया रखडली आहे. तब्बल 12 हजार 202 विद्यार्थ्यांचे ऑनलाइन प्रवेश होऊ शकलेले नसून त्यांचे वर्ष वाया जाण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. महापालिकेच्या क्षेत्रातील 4 हजार 932 विद्यार्थ्यांचेच प्रवेश झाले आहेत.

इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी पहिली फेरी आटोपल्यानंतर 10 सप्टेंबरला दुसरी यादी जाहीर होणार होती. त्यानंतर लागोपाठ तिसरी व चौथी, अशा फेऱ्यांचे नियोजन होते. मात्र नऊ सप्टेंबरला सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाने प्रवेशप्रक्रिया बंद झाली. ती अद्यापही सुरू होऊ शकलेली नाही. 10 ते 29 सप्टेंबर या कालावधीत प्रवेश प्रक्रिया पूर्ण होऊन सत्र सुरू होणार होते. ते आता पूर्णतः रखडले आहे.

अमरावती शहरातील विविध महाविद्यालयांत सर्व शाखांमिळून 15 हजार 360 जागा आहेत. 14 हजार 990 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून 12 हजार 202 विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी फॉर्म क्र. 1 भरून प्रक्रियेत सहभाग घेतला. त्यातील कला शाखेत 1089, वाणिज्य शाखेत 896, विज्ञान शाखेत 2753 व एमसीव्हिसी शाखेत 194 विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहेत, अशी माहिती ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया समितीचे समन्वयक अरविंद मंगळे यांनी दिली. उर्वरित प्रवेश दुसऱ्या फेरीपासून होणार होते, ते सर्व प्रवेश रखडले आहेत.

अकरावीला प्रवेश घेण्यापूर्वी पॉलिटेक्‍निक व आयटीआयकडे काही विद्यार्थ्यांनी प्रयत्न केले. त्यातील ज्यांना प्रवेश मिळू शकला नाही त्यांना अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेची प्रतीक्षा आहे. काही विद्यार्थ्यांनी ग्रामीण भागातील महाविद्यालयांत प्रवेश घेतला. असे असले तरी अजूनही सात हजारांवर विद्यार्थ्यांचे प्रवेश शिल्लक आहेत. मराठा आरक्षणाचा तिढा सुटेस्तोवर महाविद्यालयांनी प्रवेशप्रक्रिया सुरू करण्याचे धाडस करायचे नाही, अशी भूमिका घेतली आहे.

सत्र कसे सुरू होणार

प्रवेशप्रक्रियाच पूर्ण झाली नसल्याने महाविद्यालयांतील अकरावीच्या जागा रिक्त आहेत. एकूण जागांपैकी एक चतुर्थांश विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहेत. त्यांच्यासाठी ऑनलाइन अभ्यासक्रमही महाविद्यालयांना सुरू करता येऊ शकलेले नाही. त्यामुळे यंदा शैक्षणिक सत्र कसे सुरू होईल, हा कळीचा मुद्दा आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com