‘हिंदी’च्या विद्यार्थ्यांकरिता मराठी माध्यमाचा पेपर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 मार्च 2017

गोंदिया - सालेकसा तालुक्‍यातील पिपरिया हायस्कूल पिपरियाच्या केंद्रावर मंगळवारी इयत्ता दहावीच्या हिंदी माध्यमाच्या विद्यार्थ्यांकरिता चक्क मराठी माध्यमाचा पेपर आला. ऐन पेपर सुरू होण्याच्या वेळेत हा प्रकार घडल्याने विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. परीक्षकांची तारांबळ तर उडालीच; शिवाय घामही फुटला. या प्रकारामुळे परीक्षा मंडळाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.

गोंदिया - सालेकसा तालुक्‍यातील पिपरिया हायस्कूल पिपरियाच्या केंद्रावर मंगळवारी इयत्ता दहावीच्या हिंदी माध्यमाच्या विद्यार्थ्यांकरिता चक्क मराठी माध्यमाचा पेपर आला. ऐन पेपर सुरू होण्याच्या वेळेत हा प्रकार घडल्याने विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. परीक्षकांची तारांबळ तर उडालीच; शिवाय घामही फुटला. या प्रकारामुळे परीक्षा मंडळाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे इयत्ता दहावीच्या परीक्षेला ७ मार्चपासून सुरुवात झाली. जिल्ह्यातील ९८ केंद्रांवरून विद्यार्थी परीक्षा देत आहेत. मंगळवारी बीजगणिताचा पेपर होता. सालेकसा तालुक्‍याच्या पिपरिया हायस्कूल पिपरिया या केंद्रातून १५६ विद्यार्थी परीक्षा देत आहेत. या विद्यार्थ्यांना हिंदी माध्यमातून पेपर सोडवायचा होता. त्यानुसार बोर्डाकडून प्रश्‍नपत्रिकांचा संचदेखील उपलब्ध झाला.

प्रश्‍नपत्रिकांच्या पॉकेटवर ‘हिंदी’ लिहिले होते. त्यामुळे सारे काही व्यवस्थित असल्याचे केंद्रप्रमुखांसह परीक्षकांना वाटले. विद्यार्थी केंद्रस्थळी आले. परीक्षेची वेळ जवळ आली. त्यावेळी पॉकेट फोडण्यात आले. तेथील प्रश्‍नपत्रिका पाहून सारेच अचंबित झाले. हिंदी माध्यमाऐवजी मराठी माध्यमाचा पेपर पॉकेटात असल्याचे लक्षात आले. त्यामुळे केंद्रप्रमुखांसह परीक्षकांची धावाधाव झाली. 

अतिरिक्त प्रश्‍नपत्रिकांचा संच कोठे मिळतो, याची चाचपणी सुरू झाली. सालेकसाचे गटशिक्षणाधिकारी वाय. सी. भोयर यांनी आमगाव येथील केंद्रावर जाऊन अतिरिक्त प्रश्‍नपत्रिका आणल्या. काहींनी तालुक्‍यातील केंद्रकेंद्रावर जाऊन प्रश्‍नपत्रिका आणल्या. हा काय प्रकार आहे, म्हणून विद्यार्थीही संभ्रमात पडले. सकाळी ११ वाजता सुरू होणारा पेपर तब्बल तासभराने म्हणजे दुपारी १२ वाजता सुरू झाला. यात विद्यार्थ्यांनादेखील मानसिक त्रास सहन करावा लागला. शिक्षण मंडळाच्या भोंगळ  कारभारामुळे असले प्रकार घडत असल्याने विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी शिक्षण विभागाच्या कार्यप्रणालीवरच संताप व्यक्त केला आहे.

आमच्या हातात पडलेल्या प्रश्‍नपत्रिकांच्या पॉकेटवर हिंदी लिहिले होते. परीक्षकांनी पॉकेट फोडले तेव्हा त्यात मराठी माध्यमाचे पेपर होते. त्यामुळे मी खुद्द आमगाव येथे जाऊन अतिरिक्त प्रश्‍नपत्रिका आणल्या. त्यामुळे दुपारी १२ ला पेपर सुरू करण्यात आला. विद्यार्थ्यांना दुपारी तीनपर्यंत पेपर सोडविण्याची परवानगी देण्यात आली. 
- वाय. सी. भोयर, गटशिक्षणाधिकारी, सालेकसा.
 

दर्रेकसा केंद्रावर उर्दूच्या प्रश्‍नपत्रिका?
सालेकसा तालुक्‍यातीलच दर्रेकसा केंद्रावर उर्दू भाषेतील प्रश्‍नपत्रिका मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये खळबळ उडाली. हा प्रकार उजेडात येताच तेथील विद्यार्थ्यांनाही उशिरा परीक्षेला सामोरे जावे लागले. हे विशेष!

Web Title: marathi language paper for hindi student