मराठी भाषिक गावात तेलगू ग्रामपंचायत

सुग्रीव गोतावळे
सोमवार, 6 ऑगस्ट 2018

जिवती (जि. चंद्रपूर) - जिवती तालुक्‍यातील 14 मराठी भाषिक गावे आंध्र, तेलंगण सीमेला लागून आहे. या गावांवर दोन्ही राज्यांनी दावा केला आहे. मात्र, अजूनही हा तिढा सुटला नाही. महाराष्ट्र सरकार या गावांकडे फारसे लक्ष देत नसल्याने तेलंगण सरकारने या गावांत सोयीसुविधा पुरविणे सुरू केले आहे. आता तर भोलापठार या गावात तेलगू ग्रामपंचायतीचे कार्यालय अलीकडे सुरू करण्यात आले. हळूहळू या भागातील नागरिकांची मने मिळविण्याचा प्रयत्न तेलंगण सरकारकडून सुरू आहे.

चंद्रपूर जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर जिवती तालुका आहे. या तालुक्‍यानंतर आंध्र, तेलंगणची सीमा सुरू होते. सीमेलगतच महाराष्ट्राची 14 गावे आहेत. गेल्या कित्येक वर्षांपासून दोन्ही राज्यांनी या गावांवर आपला दावा केला होता. मात्र, अजूनही हा वाद शमला नाही. न्यायालयात सध्या सीमावादाचे प्रकरण सुरू आहे. महाराष्ट्र सरकारचे या गावांकडे पाहिजे तसे लक्ष नाही. त्यामुळेच तेलंगण सरकारने या चौदाही गावांवर ताबा मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. या भागातील नागरिकांची मने वळविण्यासाठी येथे रस्ते, वीज, शाळा, अंगणवाड्या, स्वस्त धान्य दुकाने आणि आरोग्यविषयक सुविधा तेलंगण सरकार पुरवीत आहेत. आता तर नागरिकांच्या समस्या सोडविण्याच्या अनुषंगाने तेलंगण सरकारने भोलापठार या गावात तेलगू ग्रामपंचायतीची स्थापना केली. त्याचे रीतसर उद्‌घाटनही करण्यात आले. उद्‌घाटन सरपंच प्रमश्‍वेर सूर्यवंशी यांनी केले.

गावातच होणार कामे
या ग्रामपंचायतीअंतर्गत रामनगर, लेंडीगुडा, भोलापठार, गौरी, देवीतांडा या गावांचा समावेश होतो. पूर्वी ग्रामपंचायतीअंतर्गत कामासाठी केरामिटी या गावाला जावे लागत होते. तेथे जाण्यासाठी नागरिकांना मोठी कसरत करावी लागत होती. आता भोलापठार येथेच ग्रामपंचायत झाल्याने तेथे सर्व कामे होतील. त्यामुळे गावकऱ्यांत आनंदाचे वातावरण आहे.

Web Title: marathi language village telgu grampanchyat