राज्यातील लस उपलब्धतेचा तिढा सुटला; २१ दिवसात लसीकरण

अनुप ताले
रविवार, 11 मार्च 2018

विभागीय बैठकीत येत्या १२ मार्चपर्यत २६ लाख ९९ हजार ४५८ लाळ्या खुरकत प्रतिबंध लसीचे डोस जिल्हा निहाय उपलब्ध करून दिले जाणार असल्याचे सागण्यात आले. लस प्राप्त झाल्यापासून २१ दिवसात कृती आराखड्यानुसार उपक्रम राबवून बारावी फेरी पूर्ण केली जाईल.
- डॉ. व्ही.बी. भोजने, सहआयुक्त, पशुसंवर्धन विभाग, अमरावती

अकोला : प्रशासकीय गुंतवड्यात लस खरेदी रखडल्याने यंदा राज्यभरात पहिल्या टप्प्यातील लाळ्याखुरकतचे लसीकरण झाले नाही. त्यामुळे कोट्यवधी पशुंच्या आरोग्याला धोका निर्माण झाला होता. लस उपलब्ध नसल्याने दुसऱ्या टप्प्यातील लसीकरणसुद्धा होणार की नाही याची शंका होती. परंतु, बुधवारी (ता.७)हा तिढा सुटला असून, १२ मार्चपर्यंत राज्यभरात लसीचे वितरण होणार आहे. अमरावती विभागात २७ लाख पशुसंख्या असून, तेवढीच लस उपलब्ध करून दिला जाणार आहे.

द्वीखुरी पशुंमध्ये होणारा लाळ्या खुरकत हा अत्यंत संसर्गीक व विषाणूजन्य आजार आहे. या आजाराचे निमुर्लन करण्यासाठी पाच वर्षापासून राज्य शासनाने लसीकरण मोहिम सुरू केली. त्यानुसार पशुसंवर्धन विभागाच्या विविध संस्थांद्वारे वर्षातून दोन टप्‍प्यात गावागावात लसीकरण करण्यात येत आहे. त्यानुसार गेल्यावर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये गायी-म्हशींना लाळ्या खुरकत प्रतिबंधक लसीचे लसीकरण करण्यात आले होते. मात्र त्यानंतर राज्यपातळीवर या लसीची खरेदी न झाल्याने, राज्यातील पशुधन अडचणीत आले होते. राज्य पातळीवरून सप्टेंबरमध्येच लस उपलब्ध होऊन लसीकरण होणे आवश्यक होते. परंतु सरकारच्या निर्णयांमुळे वेळीच लस उपलब्ध झाली नाही. याबाबत पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी विधानपरिषदेत शेतकऱ्यांची जाहीर माफीसुद्धा मागीतली होती. परंतु लस उपलब्धतेबाबत गुंता कायम असल्याने, मार्च-एप्रिलमध्ये दुसऱ्या टप्प्यातील लसीकरण होणार की नाही याची शाश्वती नव्हती.

बुधवारी (ता.७) अमरावती येथे झालेल्या विभागीय बैठकीत या समस्येचे निराकरण झाल्याचे सांगण्यात आले असून, १२ मार्चपर्यंत विभागातील पाचही जिल्ह्यात २६ लाख ९९ हजार ४५८ पशुंसाठी तेवढीच लस उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

काय आहे लाळ्या खुरकत?
हा रोग खूर विभागलेल्या पशुंना प्रामुख्याने सांसर्गिक पाणी व खाद्य खाल्ल्याने होतो. याची लक्षणे म्हणजे जनावरांचे खाणे- पिणे बंद होते, ताप येतो. दूधउत्पादनात घट येते. काही वेळेस उत्पादनक्षमता कायमची नष्ट होण्याची शक्‍यता असते. पशुंच्या जिभेवर, टाळूवर व तोंडाच्या आतील भागात फोड येतात. तोंडातून चिकट तारेसारखी लाळ गळते. पायांमध्ये खुरातील बेचकीध्ये फोड येतात व अपंगत्व येते.

विभागातील पशुसंख्या
जिल्हा पशुसंख्या
अकोला ३,१८,६४६
अमरावती ६,६०,८१३
यवतमाळ ८,१५,१४२
वाशिम ३,०५,५८१
बुलडाणा ५,९९,२७६
एकूण २६,९९,४५८

विभागीय बैठकीत येत्या १२ मार्चपर्यत २६ लाख ९९ हजार ४५८ लाळ्या खुरकत प्रतिबंध लसीचे डोस जिल्हा निहाय उपलब्ध करून दिले जाणार असल्याचे सागण्यात आले. लस प्राप्त झाल्यापासून २१ दिवसात कृती आराखड्यानुसार उपक्रम राबवून बारावी फेरी पूर्ण केली जाईल.
- डॉ. व्ही.बी. भोजने, सहआयुक्त, पशुसंवर्धन विभाग, अमरावती

Web Title: Marathi news Akola news animal vaccination