हे कार्यालय तुमचेच आहे... मध्यस्थाची गरज नाही!

मनोज भिवगडे
शनिवार, 3 फेब्रुवारी 2018

सर्व कार्यालय आणि अधिकारी वाईट नसतात. नागरिकांची शासकीय कार्यालयाकडे बघण्याची मानसिकता बदलण्याची गरज आहे. हा बदल एका दिवसात होणार नसला तरी त्याची सुरुवात मी माझ्या कार्यालयापासून करतो आहे.
- राजेश खवले, उपजिल्हाधिकारी (महसूल)

अकोला : ‘हे कार्यालय तुमचेच आहे... भेटण्याच्या वेळेवर कोणतेही बंधन नाही... आपण थेट भेटू शकता... कुणाच्याही परवानगीची... मध्यस्थाची गरज नाही...’ असा फलक कोणत्याही शासकीय कार्यालयाच्या बाहेर लावला असेल तर त्यावर कुणाचाही विश्‍वास बसणार नाही. मात्र अकोल्यात महसूल विभागात उपजिल्हाधिकारी राजेश खवले यांनी त्यांच्या कार्यालयात हा सुत्य उपक्रम सुरू केला आहे.

कोणत्याही शासकीय कार्यालयाकडे बघण्याचा नागरिकांना दृष्टिकोन नकारात्मक झाला आहे. त्याला कारण तेथील भ्रष्ट व्यवस्था आहे. मात्र, सर्वच कार्यालय आणि तेथील अधिकारी भ्रष्ट नसतात. याचा प्रत्यय आणून देणारा सुत्य उपक्रम उपजिल्हाधिकारी (महसूल) राजेश खवले यांनी त्यांच्या कार्यालयात सुरू केला आहे. संपर्कासाठी थेट अधिकाऱ्यांचा व्हॉट्स ॲप क्रमांकही दिला आहे. ‘हे कार्यालय तुमचेच आहे. भेटण्याच्या वेळेवर कोणतेही बंधन नाही... उपजिल्हाधिकारी यांना भेटण्यासाठी कुणाच्याही परवानगीची गरज नाही’ थेट अशा शब्दात नागरिकांचे शासकीय कार्यालयात स्वागत होत असेल तर त्या कार्यालयातील एकूण व्यवस्थेचा परिचय होतो. अकोला जिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हाधिकारी (महसूल) राजेश खवले यांनी नागरिकांसाठी भ्रष्टाचार मुक्त आणि पारदर्शी प्रशासकीय कारभाराकरिता त्यांच्या कार्यालयात सुत्य उपक्रम सुरू केले आहेत. त्याची सुरुवात त्यांनी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरच नागरिकांना कार्यालयातील एकूण पारदर्शी कारभाराचा परिचय करून देणारे फलक लावून केली आहे.

या फलकावर उपजिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या व्यस्त कार्यातून केव्हाही भेटण्याची मूभा नागरिकांना दिली आहे. कार्यालयात कामाच्या निमित्ताने येणाऱ्या कोणत्याही नागरिकाला निराश होऊन परत जावे लागू नये म्हणून उपजिल्हाधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीत त्यांच्याशी संपर्क साधण्याकरिता व्हॉट्स क्रमांकही देण्यात आला. अधिकारी दाैऱ्यावर असतील तर त्यावर नागरिकांनी त्यांची समस्या मांडल्यास तातडीने किंवा ती शक्य तेवढ्या लवकर सोडविण्याची व्यवस्था उपजिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यालयात केली आहे.

मध्यस्थांची गरज नाही
महसूल विभाग आणि भ्रष्टाचार हे समिकरण अनेक वर्षांपासून तयार झाले आहे. भ्रष्टाचाराची ही कीड फार खोलवर रुजली असल्याने चांगले काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनाही एकाच चष्म्यातून बघितले जाते. ही परिस्थिती बदलणे एका दिवसात शक्य नसले तरी मध्यस्थांसारखी भ्रष्टाचाराचे मूळ असलेली साखळीच नष्ट करण्याचे पाऊल उपजिल्हाधिकाऱ्यांनी उचलले आहे.

नियमानुसारच काम
‘‘आम्ही ते ते प्रत्येक काम करतो जे नियमानुसार आहे आणि आमच्या अधिकार क्षेत्रातील आहे.’’ हे फलकावरील वाक्य उपजिल्हाधिकाऱ्यांच्या एकूणच कारभाराचा परिचय देणारे आहे. नागरिकांची दिशाभूल करून काम करणाऱ्या व्यवस्थेलाच चपराक देण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे.

सर्व कार्यालय आणि अधिकारी वाईट नसतात. नागरिकांची शासकीय कार्यालयाकडे बघण्याची मानसिकता बदलण्याची गरज आहे. हा बदल एका दिवसात होणार नसला तरी त्याची सुरुवात मी माझ्या कार्यालयापासून करतो आहे.
- राजेश खवले, उपजिल्हाधिकारी (महसूल)

Web Title: Marathi news Akola news Rajesh Khawle work process