कोट्यवधीची हळद धोक्यात! 

Turmeric
Turmeric

पीक काढावे की नाही, शेतकरी द्विधा अवस्थेत; पावसाचे संकट डोक्यावर 

अकोला - सध्या जिल्ह्यातील बहुतांश भागात हळदीचे पीक काढणीवर आले आहे. आता अधिक काळ ते जमिनीत ठेवले, तर हळकुंड, कंद खराब होण्याची, तसेच वजनात मोठी घट येण्याची शक्यता आहे. मात्र, त्याहूनही मोठे संकट म्हणजे, पीक काढून ते सुकविताना पाऊस पडल्यास सगळ्या उत्पादनाचे नुकसान होण्याची भीती आहे. त्यामुळे डोक्यावर पावसाचे संकट असताना 'पीक काढावे की, नाही'? अशा द्विधा अवस्थेत जिल्ह्यातील हळद उत्पादक सापडले आहेत. 

शेतकऱ्यांनीही अपारंपरिक पिकांचे महत्त्व लक्षात घेऊन, त्यांच्या पेरणीकडे भर द्यायला सुरवात केली. त्यातही येथील हवामानात भरपूर उत्पादन देईल व अधिक मागणी असणारे, हळदीचे पीक घेण्यासाठी शेतकऱ्यांनी विशेष पसंती दर्शविली. त्यामुळे जुन-जुलै २०१७मध्ये जिल्ह्यात जवळपास ४०० हेक्टरवर हळदीच्या पिकाची पेरणी झाली. सध्या हळदीचे पाने गळली असून, पीक काढणीवर आले आहे. परंतु आठवडाभरापासून जिल्ह्यात ढग दाटले आहेत. हवामान विभागानेसुद्धा २४ मार्चपर्यंत जोरदार पाऊस व गारपिटीची शक्यता वर्तविली आहे. तेव्हा पीक अधिक काळ जमिनीत ठेवल्यास ते खराब होण्याची शक्यता आहे, तर काढून ते सुकविताना पावसाने ओले झाल्यास कोट्यवधीच्या पिकाचे नुकसान होण्याची शक्यता आहे. 

''जुन-जुलैमध्ये पेरणी झालेल्या हळदीची काढणी आता करणे गरजेचे आहे. चार ते पाच दिवस काढणी लांबल्यास हरकत नाही. परंतु, दोन ते तीन आठवडे विलंब झाल्यास हळकुंड खराब होण्याची तसेच वजनात घट येण्याची शक्यता आहे. तेव्हा लवकरात लवकर पीक काढून ते सुरक्षितता बाळगत योग्य पद्धतीने तयार करावे''.
-गजानन तुपकर, विषय विशेषज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, अकोला 

नऊ महिन्यात भरपूर उत्पन्न 
जून-जुलै मध्ये हळदीची बहुतांश लागवड होत असून, ९ महिन्यात पीक निघते. जिल्‍ह्यात ‘तेलम’ हळद नावाची सर्वधिक पेरणी होत असून, त्यापासून एकरी १०० ते १२५ क्विंटल ओले व २० ते २२ क्विंटल कोरडे पीक निघते. हळद पावडर करताना एकरी एक क्विंटल उत्पादन कमी होते. परंतु, हळकुंडांना सध्या सात ते आठ हजार प्रतिक्विंटल व हळद पावडरला २० हजार रुपये क्विंटलचा भाव मिळतो. २०११-१२ मध्ये हळकुंडाना अकोल्यात १३ हजार प्रतिक्विंटल भाव होता. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com