मासे विक्रीतून शेतीला जोडधंदा; दीड लाखांचा नफा 

श्रीधर ढगे
गुरुवार, 11 जानेवारी 2018

जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून पाळोदीच्या शेतकऱ्यांना शेततळे निर्मितीसाठी अनुदान देण्यात आले. त्याचा चांगला लाभ शेतकऱ्यांना होत आहे. या शेततळ्यावर  नुसतेच मत्स्य उत्पादन न घेता त्यातील पाण्याचा खरीप व रब्बी हंगामात सिंचनाकरिता केला जातो. या पाण्यावर अन्य पिके घेतल्या जातात. त्यामुळे शेतकऱ्यांना मत्स्योत्पादनासोबतच दुहेरी उत्पन्नाचा फायदा होत आहे.यातून शेतकऱ्यांची उन्नती साधली गेली आहे. 
- एस . एस . ढाकणे, कृषी अधिकारी खामगाव 

खामगाव : शेती परवडत नाही असे रडगाणे गात बसण्यापेक्षा शेतीला जोडधंदा शोधून शेगाव तालुक्यातील पाळोदी येथील शेतकऱ्यांनी उन्नतीचा मार्ग शोधला . शेगाव तालुकयातील पाळोदीच्या शेतकऱ्यांनी शेततळ्यात मत्स्योत्पादन करून 

मासे विक्रीतून शेतीला जोडधंदा निर्माण करत वर्षभरात दीड लाख रुपयांचा निव्वळ नफा कमविला आहे. 

शेगाव तालुका तसा सिंचनाच्या बाबतीत मागे आहे . त्यामुळे शेतकऱ्यांना पावसाच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागते. पाण्याअभावी बारमाही पिके घेता येत नाहीत . शेतीला जोडधंदा म्हणून शेतकरी नदी व छोट्या तलावात मत्सपालन करत , मात्र अत्यल्प  पर्जन्यमानामुळे मत्स्य व्यवसाय धोक्यात आला होता. मात्र जलयुक्त योजनेच्या माध्यमातून  पाळोदी गावात शेततळ्यांनी मत्स्यव्यवसायाला तारले आहे. शासनाच्या अनुदानावर तीन शेतकऱ्यांनी शेततळे तयार करून त्यामध्ये मत्स्योत्पादन घेण्यास सुरुवात केली आहे. मत्स्यबीजावर हे शेतकरी वर्षाकाठी दीड लाखांचे उत्पन्न घेत आहेत.शेगाव तालुक्यातील पाळोदीचे शेतकरी ज्ञानेश्वर जनार्दन भेंडे, राहुल तायडे व वानखडे यांना कृषी विभागाच्या माध्यमातून शेततळे मंजूर झाले.तालुका कृषी अधिकारी एस एस ठाकणे , कृषी सहायक डी.एन. राठोड यांच्या देखरेखीखाली शेततळ्यांची निर्मिती झाल्यानंतर त्यातून मत्स्योत्पादन घेण्याचे ठरविण्यात आले. ३० बाय ३० व तीन मीटर खोली असलेले या शेतळ्यांमध्ये कथला व सायप्रन्स जातीचे मत्स्यबीज आणून शेततळ्यांमध्ये सोडण्यात आले. ३ महिन्यांत अर्धापावपर्यंत मच्छीची वाढ होते. पावकिलोची झाल्यानंतर विक्रीला काढली जाते. वर्षभरात या शेततळ्यामध्ये मत्स्योत्पादन घेतले जात असल्याने प्रत्येक शेतकऱ्याला खर्च वगळता दीड लाख रुपयांचा निव्वळ नफा राहतो.

अलीकडच्या काही वर्षांपासून अत्यल्प पर्जन्यमान होत असल्याने तलावांमध्ये जलसाठा पाहिजे त्या प्रमाणात राहात नाही. परिणामी मच्छीमारांच्या मत्स्य व्यवसायावर अवकळा आली आहे. कधी, कधी अतिवृष्टी झाल्यास मत्स्यबीज वाहून जाते. त्यामुळे हा व्यवसाय करावा की नाही? असा प्रश्न पडतो. दरम्यान, जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत जिल्हाभरात शेततळ्यांना वाव मिळाला. त्यामुळे पाण्याची सोय झाली असून त्याच शेततळ्यात काही शेतकरी मत्स्योत्पादन घेत आहेत. परिश्रमाने उत्पन्न घेणाऱ्या शेतकऱ्यांनी दुष्काळावर मात केल्याचे दिसून येते. 

जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून पाळोदीच्या शेतकऱ्यांना शेततळे निर्मितीसाठी अनुदान देण्यात आले. त्याचा चांगला लाभ शेतकऱ्यांना होत आहे. या शेततळ्यावर  नुसतेच मत्स्य उत्पादन न घेता त्यातील पाण्याचा खरीप व रब्बी हंगामात सिंचनाकरिता केला जातो. या पाण्यावर अन्य पिके घेतल्या जातात. त्यामुळे शेतकऱ्यांना मत्स्योत्पादनासोबतच दुहेरी उत्पन्नाचा फायदा होत आहे.यातून शेतकऱ्यांची उन्नती साधली गेली आहे. 
- एस . एस . ढाकणे, कृषी अधिकारी खामगाव 

Web Title: Marathi news Buldhana news fish market