'बंधूप्रेम' मिळाले नसल्याची पंकजाताई मुंडेंची खंत

श्रीधर ढगे
शनिवार, 13 जानेवारी 2018

खामगाव मतदार संघातील विविध गावांच्या पाणी पुरवठा योजना आणि रोहणा प्राथमिक आरोग्य केंद्रातील शासकिय निवासस्थानांचा भूमिपूजन कार्यक्रम शुक्रवारी पार पडला. पाच वाजताचा कार्यक्रम रात्री 8 वाजता सुरू झाला, तरी पंकजाताईंच्या चाहत्यांनी मोठी गर्दी केली.

खामगाव (बुलडाणा) :  मोठी बहीण ही आई सारखी असते; म्हणूनच मी आमदार आकाशवर आईप्रमाणे प्रेम करेल. कारण बहीण भावात प्रेम असते की नसते हे मला माहित नाही अशा शब्दांत 'बंधूप्रेम' मिळाले नसल्याची खंत ग्रामविकास, महिला व बालकल्याण मंत्री पंकजाताई मुंडे यांनी व्यक्त केली. त्या खामगाव तालुक्यातील पाणी पुरवठा योजना भूमिपूजन कार्यक्रमात बोलत होत्या.

खामगाव मतदार संघातील विविध गावांच्या पाणी पुरवठा योजना आणि रोहणा प्राथमिक आरोग्य केंद्रातील शासकिय निवासस्थानांचा भूमिपूजन कार्यक्रम शुक्रवारी पार पडला. पाच वाजताचा कार्यक्रम रात्री 8 वाजता सुरू झाला, तरी पंकजाताईंच्या चाहत्यांनी मोठी गर्दी केली. विशेष म्हणजे पंकजाताई यांनी रात्री विश्राम गृहावर न थांबता फुंडकर परिवारासोबत त्यांच्या घरी मुक्काम केला.आजही दिवसर त्या खामगाव राहणार असून विवीध कार्यक्रम आहेत.

भाजपाचे जेष्ठ नेते दिवंगत गोपीनाथ मुंडे व कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांची मैत्री महाराष्ट्रात सर्वश्रुत आहे. हाच धागा पकडून , "प्रमोदजी महाजन , गोपीनाथजी आणि माझे प्रेमाचे संबध होते. गोपीनाथजी वर्षातून एकदा खामगावला येत असत. पंकजाताई तुम्ही सुद्धा ही परंपरा कायम ठेवा. खामगाव मतदारसंघ आणि तुमचा भाऊ आमदार आकाश फुंडकर यांच्यावर प्रेम असू द्या " असे कृषिमंत्री भाऊसाहेब फुंडकर म्हणाले. त्यानंतर पंकजाताईचे भाषण झाले. त्यांनी सुध्दा भाऊसाहेब आणि गोपीनाथ मुंढे यांच्या आठवणी सांगितल्या. "मी लहानपणी बाबासोबत भाऊसाहेबांच्या घरी येत असे. तेव्हापासून भाऊसाहेबांची मुले आकाश आणि सागर सोबत भाऊ बहिणीच्या नात्याप्रमाणे राहिले. सागर शांत तर आकाश बंड होता. तेव्हाच तो आमदार होईल असे वाटले होते.

कोअर कमिटीत असताना मी आकाशला तिकीट मिळावे याकरीता आग्रह धरला. आता आकाश आमदार असून भाऊसाहेब राज्यातील सर्वात सिनिअर मंत्री आहेत. त्यांना भविष्यातही मंत्रिपद मिळेलच ; नाहीतर तर आकाशलाच मंत्री करून टाकू अश्या पंकजाताई म्हणाल्या. "फुंडकर काका मी आकाशची मोठी बहीण आहे ,मोठी बहीण ही आई सारखी असते , मी आईप्रमाणे त्याच्यावर प्रेम करेल कारण बहीण भावात प्रेम असते की नसते हे मला माहीत नाही असेही भाषणाच्या शेवटी पंकजाताई मुंडे म्हणाल्या. त्यांनी कुणाचे नाव घेतले नाही मात्र त्यांचा रोख त्यांचे बंधू व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्याकडे होता हे उपस्थितांना कळून चुकले.आमदार ऍड आकाश फुंडकर यांनी सुद्धा माझी ताई, खामगाव मतदार संघाची ताई ,संपूर्ण महाराष्ट्राची ताई असा उल्लेख पंकजा मुंडे यांच्या बद्दल केला. सर्व महाराष्ट्र ताई म्हणून प्रेम करत असला तरी घरी मात्र बंधू  प्रेम मिळालं नसल्याची खंत पंकजाताईने बोलून दाखविली. एकंदरीतच भाऊ बहीण या नात्याचा वेळोवेळी उल्लेख झाल्याने कार्यक्रमात भावनीक वातावरण तयार झाले.

Web Title: Marathi news Buldhana news Pankaja Munde in Khamgaon