चंद्रपूर जिल्ह्यात रब्बी पिकांचे नुकसान 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 फेब्रुवारी 2018

चंद्रपूर : सोमवारी रात्रीच्या सुमारास गारपिटीसह आलेल्या पावसाचा वरोरा, राजुरा तालुक्‍यांतील गावांना तडाखा बसला. हजारो हेक्‍टर क्षेत्रांवरील हरभरा, गहू, ज्वारी, बाजरी, कापूस, मिरची पिकांचे मोठे नुकसान झाले. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वेक्षणाचे आदेश दिले. 

चंद्रपूर : सोमवारी रात्रीच्या सुमारास गारपिटीसह आलेल्या पावसाचा वरोरा, राजुरा तालुक्‍यांतील गावांना तडाखा बसला. हजारो हेक्‍टर क्षेत्रांवरील हरभरा, गहू, ज्वारी, बाजरी, कापूस, मिरची पिकांचे मोठे नुकसान झाले. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वेक्षणाचे आदेश दिले. 
सोमवारी रात्री नऊच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. चंद्रपूर, वरोरा, भद्रावती, चिमूर, ब्रह्मपुरी, नागभीड, गोंडपिंपरी, मूल, पोंभूर्णा, सावली, सिंदेवाही, राजुरा, कोरपना, जिवती, बल्लारपूर येथे जवळपास तासभर पाऊस सुरू होता. राजुरा तालुक्‍यातील मारडा, धिडशी, निर्ली या गावांमध्ये गारपीट झाली. अनेकांच्या घरांचे नुकसान झाले. गारपिटीत अनेक पक्षीही मृत्युमुखी पडले. गारपिटीचा हरभरा, गहू आणि कापसाला मोठा फटका बसला. वरोरा तालुक्‍यातील चरूर (खटी), एकोना, वनोजा, मार्डा, चिनोरा, सालोरी, आबामक्ता, वडगाव, चारगाव, निमसडा, शेगाव यासह अन्य काही गावांना गारपिटीचा तडाखा बसला. सावली तालुक्‍यातील अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली होती. त्यामुळे येथून मार्कंडा येथे जाणाऱ्या बसेस दुपारपर्यंत बंद होत्या.  

यवतमाळ जिल्ह्यात गारपिटीचे तांडव 
यवतमाळ जिल्ह्यात गारपिटीचे तांडव सुरू असून, यात हजारो हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान झाले. जिल्हा प्रशासनाने महसूल विभागाला तत्काळ नुकसानाचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहे. बाभूळगाव तालुक्‍यातील आष्टारामपूर व पाचखेड येथे सात शेतमजूर गारपिटीच्या तडाख्यात सापडल्याने जखमी झाले आहेत. सोमवारी जिल्ह्यात नऊ मिमी. पावसाची नोंद करण्यात आली. जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, मोहा येथील शाळेचे टिनाचे छप्पर सोमवारी (ता. 12) रात्री झालेल्या गारपिटीसह वादळात उडून गेले. मारेगाव तालुक्‍यातील मार्डी परिसराला सोमवारी सायंकाळी गारपिटीने झोडपून काढले. वादळवाऱ्यासह आलेल्या गारपिटीने मंगळवारी (ता. 13) दारव्हा तालुक्‍याला झोडपले. यात हरभरा, गहू पिकांचे अतोनात नुकसान झाले. 
 
 

Web Title: Marathi News Chandrapur