हुक्‍का पार्लरवर छापा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 मार्च 2018

नागपूर - अभ्यंकरनगर मार्गावरील पेट्रोलपंपशेजारी असलेल्या पूजा आर्किड बिल्डिंगमधील टेरेसवर अतिक्रमण करून सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर बुधवारी मनपाच्या लक्ष्मीनगर झोन व अग्निशमन विभागाने अतिक्रमण कारवाई केली. ही कारवाई   बुधवारी दुपारी दीडला करण्यात आली. 

एस. आर. कॅफे रेस्टॉरंट ॲण्ड स्मोकिंग झोन या नावाने या इमारतीच्या टेरेसवर हुक्का पार्लर सुरू होते. मोहम्मद शाकीर खान यांच्या मालकीच्या या पार्लरचे टेरेसवर अतिक्रमण करून बांधकाम करण्यात आले होते. अग्निशमन विभागाने ११ जानेवारीला अतिक्रमण काढण्याची नोटीस दिली होती. लक्ष्मीनगर झोन कार्यालयानेही ८ मार्चला नोटीस बजावून चोवीस तासांत अतिक्रमण काढण्याचे बजावले होते. मात्र, अतिक्रमण काढण्यासाठी पार्लर मालक टाळाटाळ करीत असल्याने पोलिसांच्या सहकार्याने टेरेसवर करण्यात आलेले बांधकाम तोडण्यात आले. या कारवाईवर स्थगिती असल्याची ओरड मालकाने केली. मात्र, न्यायालयाने यासंदर्भात असलेल्या याचिका एकत्रित करून कारवाईचे निर्देश दिले होते. त्यानुसार, ही कारवाई करण्यात आल्याची माहिती अग्निशमन विभागाचे सिव्हिल केंद्राधिकारी राजेंद्र दुबे यांनी दिली. 

या कारवाईत लक्ष्मीनगर झोनच्या सहायक आयुक्त सुवर्णा दखने, मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके, सक्करदरा केंद्राचे स्थानाधिकारी सुनील डोकरे, आपात्कालीन विभागाचे सहायक स्थानाधिकारी सुनील राऊत, लक्ष्मीनगर झोनचे उपअभियंता एस. आर. मुळे, अग्निशमन विभागाचे कर्मचारी व पोलिस यांनी भाग घेतला.

Web Title: marathi news crime hukka parlour