सैनिकांप्रमाणे निवडणुकीसाठी सज्ज राहा - मुख्यमंत्री

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 18 मार्च 2018

नागपूर - भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त 6 एप्रिल रोजी मुंबईत भाजपचे विराटरूप दर्शन विश्‍वाला घडणार आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी निवडणुकीसाठी सैनिकांप्रमाणे सज्ज राहावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. 

नागपूर - भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त 6 एप्रिल रोजी मुंबईत भाजपचे विराटरूप दर्शन विश्‍वाला घडणार आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी निवडणुकीसाठी सैनिकांप्रमाणे सज्ज राहावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. 

स्थापनादिन कार्यक्रमाच्या पूर्वतयारीनिमित्त भाजपतर्फे शनिवारी वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित पूर्व विदर्भ विभागीय मेळाव्यात ते बोलत होते. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, खासदार अशोक नेते, खासदार रामदास तडस, खासदार डॉ. विकास महात्मे, महापौर नंदा जिचकार, जिल्हा परिषद अध्यक्ष निशा सावरकर, भाजपचे संघटनमंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर, आमदार प्रा. अनिल सोले, सुधाकर देशमुख, सुधाकर कोहळे, विकास कुंभारे, कृष्णा खोपडे, परिणय फुके, डॉ. मिलिंद माने, समीर मेघे, नाना श्‍यामकुळे, सुधीर पारवे, मल्लिकार्जुन रेड्डी, कीर्तिकुमार भांगडिया आदी उपस्थित होते. 

राज्यभरात बूथस्तरावर शंभर टक्के संघटनात्मक बांधणी झाल्याच्या निमित्ताने भाजपतर्फे मुंबईतच 22 डिसेंबर 2013 रोजी महागर्जना रॅली काढण्यात आली. रॅलीमुळे कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्‍वास निर्माण झाला आणि ती रॅली भाजपसाठी टर्निंग पॉइंट ठरली. आज भाजप जगातील सर्वाधिक सदस्य असलेला पक्ष ठरला आहे. सर्वाधिक राज्यांमध्ये भाजपचे सरकार आहे. देशातील सर्वाधिक मुख्यमंत्री, मंत्री, नगरपालिका, जिल्हा परिषदा भाजपकडे आहेत. इंदिरा गांधी यांच्या काळात कॉंग्रेसला मिळालेल्या यशापेक्षाही हे मोठे यश आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. भाजपचा हा विजयरथ कुणीही रोखू शकणार नाही, हा आत्मविश्‍वास स्थापना दिनाच्या कार्यक्रमातून कार्यकर्त्यांमध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. चंद्रशेखर बावनकुळे यांनी पूर्व विदर्भातून किमान 25 हजार कार्यकर्ते मुंबईत दाखल होतील, अशी ग्वाही दिली. प्रास्ताविक सुधाकर देशमुख यांनी केले. संचालन प्रा. अनिल सोले यांनी केले. सुधाकर कोहळे यांनी आभार मानले. 

आगामी लढाईसाठी हा सराव 
भाजपने बूथस्तरावर संघटनबांधणीवर भर दिला. राज्यातील 91 हजार बूथपैकी 84 हजार बूथ बांधले असून, 80 हजार बूथचे व्हेरिफिकेशनही झाले आहे. भाजपच्या पाठीशी मोठी फौज उभी झाली आहे. सैन्य सतत लढत नसले तरी लढाईबाबत अनिश्‍चितता असल्याने सराव कायम असावा लागतो. मुंबईतील महामेळावा आगामी लढाईसाठीचा सराव आहे. भाजपच्या सैन्यात आत्मविश्‍वास निर्माण करून लढाईसाठी सज्ज करण्याचा हा प्रयत्न असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

Web Title: marathi news Devendra Fadnavis Chief Minister nagpur news election