सहा तासांनंतर अपहृत मुलगी सापडली

सहा तासांनंतर अपहृत मुलगी सापडली

नागपूर - घरासमोर खेळणाऱ्या चारवर्षीय चिमुकलीला एका आरोपीने दुचाकीने अपहरण केले. ही घटना  बुधवारी सायंकाळी साडेचार वाजताच्या सुमारास लकडगंज पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. यामुळे पोलिस दलात एकच खळबळ उडाली होती. लकडगंज पोलिसांची दोन पथके आणि गुन्हे शाखेच्या पाच पथकांची नेमणूक करून चिमुकलीचा शोध घेणे सुरू होते. शेवटी रात्री नऊ वाजताच्या सुमारास ती चिमुकली मेडिकलमधील वॉर्ड क्र. ३४ मध्ये सापडली. तब्बल सहा तासांच्या अविरत शोधानंतर चिमुकली गवसल्याने पोलिसांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला. श्रद्धा अरुण सारवणे (वय ४, रा. लाकडीपूल, हत्तीनाला) असे चिमुकलीचे नाव आहे. 

अरुण सारवणे (वय २६) हे महापालिकेच्या महाल झोन कार्यालयात सफाई कामगार म्हणून कार्यरत आहेत. पत्नी गृहिणी असून मोठी मुलगी श्रद्धा व लहान मुलगा आहे. त्यांच्या शेजारीच लहान भाऊ राहतो. आज बुधवारी सायंकाळी साडेचार वाजता श्रद्धा व चुलतभाऊ यश (वय ६) हे दोघेही घरासमोरील रस्त्यावर खेळत होते. दरम्यान, २५ ते ३० वर्षे वयोगटातील एक तरुण दुचाकीने तेथे आला.  त्याने कबुतर दाखवतो असे यश आणि श्रद्धाला सांगितले. त्यासाठी दुचाकीवर बसून दूर जावे लागेल, असेही सांगितले. श्रद्धा आरोपीच्या दुचाकीवर बसली तर यश घरी निघून गेला. आरोपी चिमुकलीला घेऊन भरधाव निघून गेला. यशने घरी गेल्यानंतर श्रद्धाच्या आईला घटना सांगितली. तिने लगबगीने पतीला फोन केला आणि स्वतःही परिसरात श्रद्धाला शोधायला लागली. नातेवाइकांनाही माहिती दिली. त्यामुळे तेसुद्धा शोध घेत होते. दोन तासांपर्यंत शोधाशोध केल्यानंतर अरुण सारवणे यांनी लकडगंज पोलिस स्टेशन गाठले. पोलिस निरीक्षक खांडेकर यांना माहिती दिली. त्यांनी लगेच पथके तयार करून शोधाशोध सुरू केली. तसेच गुन्हे शाखेलाही माहिती देण्यात आली. गुन्हे शाखा युनिट तीनचे प्रमुख ज्ञानेश्‍वर भेदोडकर आणि त्यांचे पथक आरोपीचा शोध घेत असतानाच ती चिमुकली मेडिकलमधील वॉर्ड क्र. ३४ मध्ये असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यांनी पथकासह लगेच मेडिकल गाठले. त्यांनी मुलीला ताब्यात घेतले. भेदरलेल्या अवस्थेत असलेल्या चिमुकलीची पोलिसांनी आस्थेने विचारपूस केली. शेवटी श्रद्धाला तिच्या आई-वडिलांच्या ताब्यात देण्यात आले.

यशचे चातुर्य
यश आणि श्रद्धा दोघांनाही आरोपीने दुचाकीवर चालण्यास सांगितले होते. श्रद्धा पटकन विश्‍वास ठेवून दुचाकीवर बसली. यशने मात्र अनोळखी युवकाच्या दुचाकीवर बसण्यास नकार दिला आणि श्रद्धालाही जाण्यास विरोध केला. तेवढ्यात युवकाने दुचाकीला किक मारली आणि भरधाव निघून गेला. यशने चातुर्य दाखविल्यामुळे ही घटना आज उजेडात आली.

सोशल मीडियाचा आधार 
श्रद्धाचे अपहरण झाल्याची खबर वाऱ्यासारखी सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरली. व्हॉट्‌सॲप, फेसबुक आणि ट्‌विटरवर त्या मुलीचे फोटो आणि पत्ता आणि अन्य माहिती फिरत होती. तसेच पोलिसांच्या अनेक व्हॉट्‌सॲप ग्रुपमध्ये मुलीचे फोटो व्हायरल झाले होते. शहरभर शोधाशोध सुरू असताना सोशल मीडियाच्या माध्यमातूनच चिमुकलीचा शोध लागल्याची माहिती आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com