आठ हजार महिलांनी साकारले ‘बेटी बचाओ’

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 मार्च 2018

वाशीम - जिल्ह्यातील महिला, मुलींनी आज (ता. ८) आंतरराष्ट्रीय महिला दिवस अनोख्या पद्धतीने साजरा करून विश्‍वविक्रमात नोंद केली. त्यामुळे जिल्ह्याचे नाव जागतिक स्तरावर पोहचले. वाशीम जिल्हा प्रशासनाच्या पुढाकाराने झालेल्या या उपक्रमात सहभागी होत जिल्ह्यातील आठ हजार ३१८ महिला-मुलींनी मानवी साखळीतून ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अभियानाचा लोगो साकारला. ८-३-२०१८ या तारखेचे औचित्य साधून साकारण्यात आलेल्या लोगोमागे स्त्री-भ्रूणहत्या रोखण्यासाठी जनजागृती करण्याचा उद्देश होता.

वाशीम - जिल्ह्यातील महिला, मुलींनी आज (ता. ८) आंतरराष्ट्रीय महिला दिवस अनोख्या पद्धतीने साजरा करून विश्‍वविक्रमात नोंद केली. त्यामुळे जिल्ह्याचे नाव जागतिक स्तरावर पोहचले. वाशीम जिल्हा प्रशासनाच्या पुढाकाराने झालेल्या या उपक्रमात सहभागी होत जिल्ह्यातील आठ हजार ३१८ महिला-मुलींनी मानवी साखळीतून ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अभियानाचा लोगो साकारला. ८-३-२०१८ या तारखेचे औचित्य साधून साकारण्यात आलेल्या लोगोमागे स्त्री-भ्रूणहत्या रोखण्यासाठी जनजागृती करण्याचा उद्देश होता. केवळ महिला व मुलींनी इतक्‍या मोठ्या संख्येने एकत्र येऊन मानवी साखळीतून अशा प्रकारचा जगात पहिल्यांदाच लोगो साकारला गेल्याने या उपक्रमाची नोंद गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्‌ने घेतली आहे.

स्त्री-भ्रूणहत्या रोखणे तसेच मुलींना शिक्षण व समान संधी मिळण्यासाठी समाजाचा मुलींकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलावा याकरिता जिल्ह्यात बेटी बचाओ, बेटी पढाओ अभियान राबवले जात आहे. या अभियानाविषयी जनजागृती करण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या संकल्पनेतून जिल्हा प्रशासनाने ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अभियानाचा लोगो साकारला. त्यानुसार येथील पोलिस कवायत मैदानावर आज झालेल्या कार्यक्रमात महिला व मुलींनी स्वयंस्फूर्तीने सहभागी होऊन ‘मुलगी वाचवा, मुलगी शिकवा’चा संदेश दिला. या उपक्रमासाठी सकाळी ८ वाजल्यापासूनच जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील महिला, मुली पोलिस कवायत मैदानावर दाखल होण्यास सुरुवात झाली होती. लोगोसाठी आवश्‍यक रंगाच्या पेहरावात मैदानावर दाखल झालेल्या महिला, मुलींनी सकाळी ११ वाजता मानवी साखळीतून ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अभियानाचा लोगो साकारला. यामध्ये विविध शाळा, महाविद्यालयांमधील विद्यार्थिनींसह जिल्ह्यातील विविध सरकारी विभाग, पोलिस प्रशासनातील महिला अधिकारी, कर्मचारी महिला, महिला बचत गट, विविध महिला संघटनांच्या सदस्य व गृहिणींनी स्वयंस्फूर्तीने सहभाग नोंदवला.

महिलांनी साकारलेला पहिलाच लोगो
‘गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्‌’चे प्रतिनिधी अलोक कुमार व त्यांच्या चमूने या उपक्रमाचे निरीक्षण केले. अशा प्रकारे इतक्‍या मोठ्या संख्येने महिलांनी एकत्र येऊन साकारलेला हा पहिलाच लोगो आहे. त्यामुळे या उपक्रमाची नोंद विश्‍व विक्रम म्हणून घेतली जाणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हा पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी याबाबतचे प्रमाणपत्र स्वीकारले.

Web Title: marathi news internation women day washim