४८ व्या वर्षी कांताबाई बारावी उत्तीर्ण

आर. व्ही. मेश्राम
सोमवार, 12 मार्च 2018

सडक अर्जुनी (जि. गोंदिया) - जिद्द, चिकाटी व आत्मविश्‍वास असेल, तर शिक्षणासाठी वयाची आडकाठी कधीच येत नाही. तालुक्‍यातील राका येथील कांताबाई जगदीश नागोसे या महिलेने चक्‍क वयाच्या ४८ व्या वर्षी बारावीची परीक्षा उत्तीर्ण करून हेच सिद्ध केले आहे. कांताबाईंनी बारावीची परीक्षा केवळ उत्तीर्णच केली नाही, तर त्यांनी ६० टक्‍के गुण घेऊन प्रथमश्रेणी मिळविली आहे. त्यांच्या या कर्तृत्वाबद्दल पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

कांताबाई २००१ पासून महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानमध्ये (उमेद) बचतगटाचे काम करीत आहेत. उमेदच्या तालुका व्यवस्थापक सविता तिडके यांच्या मार्गदर्शनात कांताबाई बचतगटाच्या मार्गदर्शिका, सधन व्यक्‍ती म्हणून काम सांभाळत आहेत. त्यांनी स्थापन केलेल्या गटाला २००७ मध्ये जिजामाता पुरस्कार मिळाला आहे. पती, चार मुली व एक मुलगा असा त्यांचा परिवार असून परिवारातील सर्व सदस्य शिक्षित आहेत. त्यांच्या दोन मुलींचे लग्न झाले असून एक मुलगी व मुलगा शिक्षण घेत आहेत. बचतगटाचे कार्य करत त्यांना इयत्ता बारावीची परीक्षा देण्याची इच्छा निर्माण झाली. 

त्यांनी खासगीरीत्या परीक्षेचा अर्ज भरला. ऑक्‍टोबर महिन्यात परीक्षा दिली आणि ६० टक्‍के घेऊन उत्तीर्णदेखील झाल्या. 

नुकतेच सडक अर्जुनी येथे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) व पंचायत समितीच्या वतीने जागतिक महिलादिनानिमित्त महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्यांच्या गटाच्या उल्लेखनीय कार्याबाबत तसेच बारावीची परीक्षा वयाच्या ४८ व्या वर्षी उत्तीर्ण झाल्याबद्दल सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

मी उमेदच्या माध्यमातून बचतगटांमध्ये काम करीत आहे. बारावीची परीक्षा मी उत्तीर्ण होईन, याचा मला विश्‍वास होता. कुटुंबाचे भरपूर सहकार्य लाभल्यामुळेच मी परीक्षा उत्तीर्ण झाले. यापुढे बचतगटाचे कार्य आणखी वाढविणार आहे. त्याचा लाभ अनेक महिलांना व्हावा, हाच माझा उद्देश आहे.
-कांताबाई नागोसे

Web Title: marathi news kantabai nagose HSC exam pass