सिंचन प्रकल्प कोरडे पडण्याच्या मार्गावर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 फेब्रुवारी 2018

दरवर्षी पाटबंधारे विभागाकडून कालवे सफाई व दुरुस्ती कामांवर कोट्यवधी रुपये खर्च करण्यात येतात, तरीही त्याचा तिळमात्र फायदा झालेला नाही. कारण बहुतांश भागात कालव्याच्या बाहेर पाणी साचलेले दिसून येते. काही ठिकाणी पाणी नाल्यात वाहून जात आहे. यावर वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे. 
- चरणसिंह ठाकूर, सत्तापक्ष नेते

काटोल - नरखेड, काटोल तालुक्‍यातील नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे, शेतजमिनी ओलिताखाली याव्यात म्हणून काटोल तालुक्‍यातील रिधोरा गावाजवळ जाम नदीवर, चिखली मैना येथे मोठ्या नाल्यावर व मूर्ती गावाजवळ सावळी अनंत, कोल्हू गावात कारनदीवर तसेच नरखेड तालुक्‍यातील पिंपळगाव वखाजी येथे धरणे बांधण्यात आली. त्यासाठी पुराचे पाणी अडविण्यात आले. माती व गाळामुळे ‘ओव्हरफ्लो’च्या भिंती समतल झाल्या आहेत. त्यामुळे धरणातील पाणी वाहून जाते आणि अगदीच थोडा जलसाठा शिल्लक राहतो. यावर आजपर्यंत उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. सध्या फेब्रुवारी महिना सुरू आहे आणि आताच जलस्तर झपाट्याने कमी होतो आहे.

काटोल शहर, काटोल एमआयडीसी, कोंढाळी येथे रिधोरा जाम प्रकल्पावरून पाणीपुरवठा होतो. चिखली नाला प्रकल्पावरून सावरगावला पाणीपुरवठा करण्यात येतो. सोबतच नरखेड शहराची तहान याच प्रकल्पावरून भागविण्यात येत होती. परंतु पाण्याची अडचण लक्षात घेऊन पिंपळगाव वखाजी येथे धरण बांधून तेथूनसुद्धा नरखेड शहराला पाणीपुरवठा केला जात आहे. वर्धा जिल्हा व नागपूर जिल्ह्याच्या सीमेवर काटोल तालुक्‍यातील कोल्हू गावाजवळ कारनदीवर धरण बांधण्यात आले. तेथून वर्धा जिल्ह्यातील कारंजा घाडगे व नरखेड तालुक्‍यातील लोहारीसावंगा येथे पाणीपुरवठा केला जात आहे. परंतु पाटबंधारे विभागाच्या अत्यंत ढिसाळ नियोजनामुळे व सातत्याने करण्यात येणाऱ्या दुर्लक्षितपणामुळे सुमारे तीन चतुर्थांश भाग कोरडाच आहे. कार नदी प्रकल्पावरून नरखेड तालुक्‍यातील शेवटचे गाव तारासावंगा व माणिकवाडापर्यंत पाणीपुरवठा करण्यासाठी कालवा तयार करण्यात आला. त्यासाठी कोट्यवधी रुपयांचा चुराडा झाला. परंतु आजही ते काम अपूर्ण अवस्थेत आहे.

येथील धरणांमधील गाळाचा उपसा करून खोलीकरण करून ओव्हरफ्लो भिंतीची उंची एक मीटर वाढविली असती तर भयावह परिस्थिती निर्माण झाली नसती, अशी रोखठोक भूमिका जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व नगरपालिकेचे सत्तापक्ष गटनेते चरणसिंग ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत घेतली. 

या परिषदेला कृषिमित्र प्रतिष्ठानचे संस्थापक दिनेश ठाकरे, नगराध्यक्ष वैशाली ठाकूर, उपाध्यक्ष जितेंद्र तुपकर, शिक्षण सभापती देवीदास कठाणे, विकास व नियोजन सभापती राजू चरडे, बांधकाम सभापती सुभाष कोठे, माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक तानाजी थोटे, सती अनसूया माता संस्थानचे विश्वस्त व नगरसेवक किशोर गाढवे उपस्थित होते.

Web Title: marathi news katol news katol irrigation project empty water