रत्नाकर गुट्टे यांच्याविरुद्ध षडयंत्राची शक्‍यता : महादेव जानकर

संजय सोनोने
गुरुवार, 6 जुलै 2017

राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष तथा पशुसंवर्धन, दुग्धविकास, मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी हा प्रकार म्हणजे रत्नाकर गुट्टे यांच्याविरुद्ध षडयंत्र असल्याची शक्‍यता वर्तवली आहे.

शेगाव (जि. बुलडाणा) : शेतकऱ्यांच्या नावावर कर्ज घेतल्याप्रकरणी राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते रत्नाकर गुट्टे यांच्यावर परभणीच्या गंगाखेड पोलिस स्टेशनमध्ये बुधवारी रात्री 11 वाजता त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष तथा पशुसंवर्धन, दुग्धविकास, मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी हा प्रकार म्हणजे रत्नाकर गुट्टे यांच्याविरुद्ध षडयंत्र असल्याची शक्‍यता वर्तवली आहे.

बुलढाणा जिल्हयाच्या दौऱ्यावर असतांना गुरुवारी ते शेगाव येथे पत्रकारांशी बोलत होते. पाच राष्ट्रीयकृत बॅंका आणि एका खासगी बॅंकेच्या अधिकाऱ्यांशी संगनमत करुन रत्नाकर गुट्टेंच्या गंगाखेड शुगर ऍन्ड एनर्जी लिमिटेड या खाजगी साखर कारखान्याने सहा जिल्ह्यातल्या एकूण 15 हजार शेतकऱ्यांच्या नावे तब्बल 328 कोटींचं कर्ज उचलल्याचं समोर आलं आहे. त्यामध्ये बुलढाणा अकोला वाशीम जिल्हयातील शेतकऱ्यांचाही समावेश आहे. या शेतकऱ्यांचे बोगस कागदपत्रं जोडून शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचं उघडकीस आलं आहे. रत्नाकर गुट्टे हे राष्ट्रीय समाज पक्षाचे पहिल्या फळीतील नेते आहेत. या पक्षाचे अध्यक्ष तथा राज्याचे फलोत्पादन मंत्री महादेव जानकर हे गुरुवारी बुलढाणा जिल्हयाच्या दौऱ्यावर आहेत याबाबत सकाळी शेगाव येथे आले असता पत्रकारांनी विचारले असता त्यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले "रत्नाकर गुट्टे यांच्या मागे षडयंत्र रचल्या जात आहे. चौकशी अंती खरं ते बाहेर येईल आणि त्यानुसार कारवाई होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. गुट्टे प्रकरण आता न्यायालयात गेल्याने त्यावर भाष्य करता येणार नसल्याचेही ते म्हणाले.

शेतकरी संपानंतर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा होण्याबरोबरच राज्यातील दूधउत्पादक शेतकऱ्यांनाही दुधाच्या खरेदी दरात प्रतिलिटर तीन रुपयांची वाढ करण्याचे राज्य सरकारने आज जाहीर केले आहे. मात्र याचा भुर्दंड ग्राहकांवर पडू नये यासाठी खरेदी किमतीचा भार सरकार उचलणार असल्याने दुधाच्या विक्री दरावर मात्र याचा कोणताही परिणाम होणार नसल्याची ग्वाही पशुसंवर्धन, दुग्धविकास, मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी सकाऴ शी बोलतांना दिली. दुधाचे दर वाढविण्याचे काम सर्वात जास्त आमच्या सरकारने केले आहे. महिने आणि दिवसात रु.दर वाढविणारा मी पहिला मंत्री आहो ज्यांनी शेतकऱ्यांना न्याय देऊ शकलो असेही ते सांगितले. यावेळी त्यांच्या सोबत रासपचे प्रदेश उपाध्यक्ष दत्ता खरात,सुनील मतकर,विनोद वणारे, नंदकुमार तुपकर, शेख युसूफ, सतिष हांडे आदींची उपस्थिती होती.

ना. जानकरांनी घेतले श्रींचे दर्शन
राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष तथा पशुसंवर्धन, दुग्धविकास, मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनीआज गुरुवारी सकाळी शेगावात पोहचल्या नंतर सर्वप्रथम श्री.संत गजानन महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी संस्थांच्या वतीने त्यांचे स्वागत सत्कार करण्यात आला. ना. जानकर यांनी पारायण हॉलमध्ये बसून महाराजांचे पारायणही केले.

Web Title: marathi news mahadeo jankar sakal news ranakar gutte