बोलींच्या संवर्धनाची महामंडळ-संघाची एक भाषा!

नितीन नायगावकर 
सोमवार, 19 मार्च 2018

नागपूर - अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांना संघ विचारांचे वावडे असले तरी बोली आणि भाषांच्या संदर्भात महामंडळ आणि संघ एकाच ‘ट्रॅक’वर आले आहेत. महामंडळ आणि वैयक्तिकरीत्या डॉ. जोशी यांचा अनेक वर्षांपासून यासंदर्भात पाठपुरावा सुरू आहे. अलीकडेच संघाच्या प्रतिनिधी सभेत झालेला ठराव आणि महामंडळाची धडपड यांची भाषेच्या संदर्भातील बोली एकच आहे.

नागपूर - अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांना संघ विचारांचे वावडे असले तरी बोली आणि भाषांच्या संदर्भात महामंडळ आणि संघ एकाच ‘ट्रॅक’वर आले आहेत. महामंडळ आणि वैयक्तिकरीत्या डॉ. जोशी यांचा अनेक वर्षांपासून यासंदर्भात पाठपुरावा सुरू आहे. अलीकडेच संघाच्या प्रतिनिधी सभेत झालेला ठराव आणि महामंडळाची धडपड यांची भाषेच्या संदर्भातील बोली एकच आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत भारतीय बोली आणि भाषांच्या संवर्धनासंदर्भात विशेष ठराव घेण्यात आला. आजवर महामंडळ मराठीच्या संदर्भात आग्रही राहिले आहे. डॉ. जोशी महामंडळाचे अध्यक्ष झाल्यापासून मराठीसोबत सर्व भारतीय भाषांच्या संवर्धनाचा मुद्दा जोरकसपणे पुढे आला आहे. बडोद्याच्या साहित्य संमेलनात व्यासपीठावरूनही सर्वच भारतीय भाषांच्या संवर्धनाचा मुद्दा चर्चेला आला. देशपातळीवर आंदोलन उभे करण्याचा विचार मांडण्यात आला. संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी आणि इतर काही पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी (ता. १६) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेऊन बारावीपर्यंत मराठीच्या सक्तीचा आग्रह मांडला. मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्यानंतर किमान दहावीपर्यंत तरी मराठी सक्तीचे होईल, अशी आशा आहे. त्यासाठी कन्नड आणि मल्याळम भाषांचे पुराव्यांसह उदाहरण राज्य शासनाला देण्यात आले.

अकरा कोटी लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्राचे मराठी भाषा विभागाचे बजेट अवघे सतरा कोटी आहे, हे निदर्शनास आणून देताना ते किमान शंभर कोटींचे असावे, अशी मागणी या भेटीत करण्यात आली. 

मराठीच्या अभिजात दर्जाचा लढा कायम असला तरी महाराष्ट्रात किमान मराठीच्या सक्तीच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल पडले आहे. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते डॉ. रघुवीर चौधरी यांनी भारतीय भाषांच्या संवर्धनासाठी एकत्र येण्याचे आवाहन बडोद्यातून केले. महामंडळाने त्यांच्या हातात हात देऊन चालण्याची तयारी दाखवली. दुसरीकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने त्यांच्या यंत्रणेतून देशपातळीवर बोली आणि भाषांसाठी कार्य करण्याचा संकल्प सोडला. मार्ग वेगवेगळे असले तरी त्यांचे लक्ष्य एकच आहे. 

भारतीय भाषा आणि बोली यांच्या अभ्युदयासाठी जे कोणी प्रयत्न करत असतील, त्यांचे स्वागतच आहे.
- डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी, अध्यक्ष अ.भा. मराठी साहित्य महामंडळ

Web Title: marathi news marathi language nagpur vidarbha