साहित्य महामंडळ जानव्यातून मुक्त : डॉ. श्रीपाल सबनीस

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 ऑक्टोबर 2017

डॉ. सबनीस यांनी महामंडळाचा उल्लेख केला असला तरी महाराष्ट्रातील काही संस्थांनी अद्याप सोवळे सोडलेले नाही. या संस्था पळी-ताम्हणं हाती घेऊनच कारभार करीत आहेत.

-  डॉ. श्रीपाद जोशी

नागपूर : अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ आणि पुण्यातील महाराष्ट्र साहित्य परिषद अनेक वर्षे जानव्यात अडकून पडले होते, मात्र आता डॉ. श्रीपाद जोशी यांच्यामुळे ते जानव्यातून मुक्त झाले आहे, असे विधान 89 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी आज (शुक्रवार) येथे केले. डॉ. जोशी यांनी आपल्या भाषणातून त्यांच्या विधानाचे समर्थनही केले. 

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय दीक्षाभूमी यांच्या संयुक्त विद्यमाने 'विद्रोही साहित्याची सामाजिक-सांस्कृतिक फलश्रुती' या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्र आयोजित करण्यात आले. या चर्चासत्राच्या उद्‌घाटन सोहळ्याला सबनीस प्रमुख पाहुणे म्हणून, तर डॉ. जोशी अध्यक्षस्थानी उपस्थित होते. विशेष म्हणजे विद्रोही साहित्याच्या संदर्भातील चर्चासत्र आयोजित करण्याची महामंडळाच्या कार्यकाळातील ही पहिलीच वेळ आहे. याचाच आशय धरून डॉ. सबनीस भाषणाच्या सुरुवातीला म्हणाले, 'विद्रोहाच्या फलश्रुतीच्या संकल्पना यापूर्वी महामंडळाच्या गर्भात हिंदोळे घेताना कधी बघायला मिळाले नाही. महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी, कार्यवाह डॉ. इंद्रजित ओरके आणि कोषाध्यक्ष डॉ. विलास चिंतामण देशपांडे यांच्या कर्तृत्वामुळेच ते एवढ्या वर्षांच्या इतिहासात शक्‍य झाले आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ आतापर्यंत जानव्यातच होते, पण जानवं तोडून ते पुढे आल्यामुळे विद्रोही साहित्याची खरी पहाट झाली असे म्हणायला मुळीच हरकत नाही.' 

डॉ. सबनीस यांच्या वक्तव्याचे डॉ. श्रीपाद जोशी यांनी अध्यक्षीय भाषणात आपल्या 'स्टाईल'ने समर्थन केले. 

'डॉ. सबनीस यांनी महामंडळाचा उल्लेख केला असला तरी महाराष्ट्रातील काही संस्थांनी अद्याप सोवळे सोडलेले नाही. या संस्था पळी-ताम्हणं हाती घेऊनच कारभार करीत आहेत. विशेषतः मुंबई आणि पुण्याकडील संस्था पेशवाई ब्राह्मण्याच्या बाहेर पडलेल्या नाहीत. विदर्भाला याची कधीच गरज पडली नाही. बापुजी अणे यांनीदेखील सांस्कृतिकदृष्ट्याच वेगळ्या विदर्भाची मागणी केली होती,' असे डॉ. जोशी म्हणाले. 

'मी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचा अध्यक्ष झालो तेव्हा अनेकांसह मला स्वतःलाही आश्‍चर्य वाटले होते. अनेकांच्या दुर्दैवाने मी अध्यक्ष झालो आहे,' असे सांगतानाच 'मला अध्यक्ष करण्याची वेळ आली, याचा अर्थ किती वाईट अवस्था निर्माण झाली होती याचा विचार करावा,' अशी मिश्‍किलीही त्यांनी केली.

Web Title: Marathi news Marathi Sahitya Parishad Shripal Sabnis Shripad Joshi