कीटकनाशक बळी प्रकरणी ‘एसआयटी’ची गोपनीय चौकशी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 नोव्हेंबर 2017

अकोला : कीटकनाशक बळी प्रकरणी विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांचे नेतृत्वात सहा सदस्यीय ‘एसआयटी’ समितीने शुक्रवारी (ता.३) अकोल्यात भेट देऊन चौकशी केली. यावेळी कृषी अधिकाऱ्यांना चौकशीच्या केंद्रस्थानी असून उपचार घेत असलेल्या बाधीतांना, वैद्यकिय अधिकाऱ्यांना तसेच मृतकांच्या कुटुंबाला भेटून माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला.

अकोला : कीटकनाशक बळी प्रकरणी विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांचे नेतृत्वात सहा सदस्यीय ‘एसआयटी’ समितीने शुक्रवारी (ता.३) अकोल्यात भेट देऊन चौकशी केली. यावेळी कृषी अधिकाऱ्यांना चौकशीच्या केंद्रस्थानी असून उपचार घेत असलेल्या बाधीतांना, वैद्यकिय अधिकाऱ्यांना तसेच मृतकांच्या कुटुंबाला भेटून माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला.

कीटकनाशक बळी प्रकरणी शासकीय मदतीसाठी अकोला जिल्ह्याला वगळण्यात आल्याने येथील लोकनेते तसेच शेतकरी संघटनेने शासनाकडे रोष व्यक्त केला होता. कीटकनाशक फवारणीमुळे विषबाधा होऊन जिल्ह्यातील सात शेतकरी, शेतमजूरांचा मृत्यू झाला असून, त्यांचे कुटुबांनासुद्धा शासनाने मदत द्यावी अशी मागणी खासदार संजय धोत्रे, आमदार रणधीर सावरक व शेतकरी जागर मंचने केली होती.

२९ आॅक्टोबर रोजी शेतकरी जागर मंचची विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांचेशी झालेल्या बैठकीत सिंह यांनी, कीटकनाशक बळी प्रकरणी जिल्ह्यातही मृतकांच्या कुटुबांना मदत दिली जाणार असल्याचे सांगितले. तसेच आमदार रणधीर सावरकर यांनीसुद्धा या निर्णयाचा दुजोरा दिला.

मात्र, त्यापूर्वी कीटकनाशक बळी प्रकरणी सखोल चौकशीसाठी पीयूष सिंह यांचे नेतृत्वात एसआयटी शुक्रवारी अकोल्यात दाखल झाली. समितीसोबत विशेष पोलिस महानिरीक्षक सी.एच. वाकडे, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, आरोग्य उपसंचालक डॉ. नितीन अंबाडेकर, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीटाचे कीटकशास्त्र विभागप्रमुख डी.बी. उंदिरवाडे, नागपूर केंद्रीय कापूस संशोधन संचालक व्ही. एन. देशमाने, फरिदाबादच्या डायरेक्टोरेट आॅफ प्लांट प्रोटेक्शन, क्वारेनटाईन स्टोरेजचे के.डब्ल्यू. देशकार, विभागीय कृषी सहसंचालक सुभाष नागरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम यांचा समावेश होता. यावेळी समितीने घेतलेले निर्णय, सूचना व चौकशीतून तयार केलेला अहवाल गुपीत ठेवला असून, तो शासनाकडे सादर केला जाणार आहे.

अशी झाली चौकशी
अकोल्यात दाखल झालेल्या एसआयटी समितीने सर्वप्रथम जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकाऱ्यांची बैठक घेवून, कीटनाशक बळी प्रकरणी जिल्ह्यातील स्थितीचा आढावा घेऊन चर्चा केली. त्यानंतर येथील शासकीय रुग्णालयात भेट देऊन उपचार घेत असलेल्या बाधीताना, वैद्यकीय अधिकाऱ्यांना भेट देऊन सविस्तर चर्चा केली. त्यानंतर पथकाने कीटकनाशकाची विषबाधा होऊन मृत पावलेल्या आगर येथील शेतमजूर राजेश मनोहर फुकट यांच्या कुटुंबाला भेट दिली.

‘एसआयटी’ समितीने कीटकनाशक बळी प्रकरणी काय चौकशी केली, काय अहवाल तयार केला, याबात मला कोणतीही माहिती नाही. समितीसमोर मी केवळ साक्षीदार म्हणून उपस्थित होतो. शिवाय पथकातील अनेकांचा मला परिचयसुद्धा नव्हता. चाैकशीच्या पुढील नियाेजनाची मला माहिती नाही.
- राजेंद्र निकम, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, अकोला

Web Title: marathi news marathi websites Akola News