'जयचंद'चे कालव्यात दोन तास! 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 जानेवारी 2018

पवनी (जि. भंडारा) : 'जयचंद' म्हणजे उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्याची शान. विदर्भातल्या व्याघ्र अभयारण्यातील आकर्षण असलेला 'जय' वाघ गेल्या दीड वर्षापूर्वी बेपत्ता झाला, तेव्हापासून आकर्षणाचे केंद्र ठरलेल्या 'जयचंद' वाघावर आज बाका प्रसंग आला. गोसे खुर्द प्रकल्पाच्या मुख्य उजव्या कालव्यात हा वाघ पडला. तब्बल दोन तासांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर 'जयचंद'ला कालव्याबाहेर काढण्यात वनकर्मचाऱ्यांना यश आले व बाहेर येताच त्याने जंगलात धूम ठोकली. शिकारीच्या नादात तो कालव्यात पडल्याचा अंदाज आहे. 

वाघांचा अधिवास असलेले उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्य पर्यटकांसाठी पर्वणीच आहे. त्यातही 'जयचंद' तर या अभयारण्याची शान आहे. आज दुपारी एक वाजताच्या सुमारास जयचंद गोसे खुर्द धरणाच्या खापरी ते कोरंभीदरम्यान असलेल्या उजव्या कालव्यात पडला. शिकार पकडण्याच्या नादात तो या कालव्यात पडला असावा, अशी शक्‍यता व्यक्त होत आहे. कालवा 20 फूट खोल आहे व त्यात सध्या पाच फूट पाणी आहे. कालव्यात पडल्यानंतर 'जयचंद'ची बाहेर पडण्याची धडपड सुरू झाली; पण, शेवाळामुळे कालव्यात घसरण असल्याने प्रयत्न करूनही त्याला बाहेर निघता येईना. 

एव्हाना 'जयचंद' कालव्यात पडल्याची माहिती होताच वन विभागाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. प्रथम कालव्यात जाळे टाकून 'जयचंद'ला पकडण्याचा प्रयत्न झाला; पण, तो जाळ्यात आला नाही. शेवटी अभयारण्याच्या बाजूने जंगलाच्या काठावरून दरी व शिडी कालव्यात टाकली. त्यावरून 'जयचंद'ला कालव्याबाहेर काढण्यात आले. तब्बल दोन तास हे प्रयत्न सुरू होते. 

कालव्याबाहेर निघताच 'जयचंद'ने जंगलात धूम ठोकली. अभयारण्याचे वनपरिक्षेत्राधिकारी दादा राऊत, भानुप्रतापसिंग तोमर, श्री. नंदेश्‍वर, किशोर कोहार, रामचंद्र कुर्झेकर, विपीन तलमले यांनी जयचंदला कालव्याबाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले. 

उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्यात वन्यप्राण्यांची संख्या वाढली आहे. शिकारीचा पाठलाग करीत वन्यप्राणी अनेकदा कालव्यात पडले आहेत. यापूर्वी नीलगायी, चितळ, सांबर असे अनेक वन्यप्राणी पडले. एकीकडे वन्यप्राण्यांच्या संरक्षणासाठी शासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. मात्र, कालव्यांमुळे वन्यप्राण्यांना धोका आहे. यासाठी शासनाने भूमिगत कालवा तयार करण्याची गरज आहे. 
- शाहिद खान, सचिव, 'सीट'

Web Title: marathi news marathi websites Bhandara Jaichand Tiger