रोहिंग्या निर्वासितांविरोधी भूमिकेस राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पाठिंबा 

वृत्तसंस्था
शनिवार, 30 सप्टेंबर 2017

म्यानमारमध्ये दहशतवादी कारवायांमध्ये हात असल्यामुळे त्या सरकारने रोहिंग्या निर्वासितांविरोधात कारवाई सुरू केली. जागतिक पातळीवर मानवतावाद दाखविताना आपल्या देशातील सर्वसामान्यांकडे दुर्लक्ष करत नाही ना, हेही पाहावे लागेल.

नागपूर : 'रोहिंग्या नागरिक त्यांच्याच मूळ देशासाठी धोकादायक ठरत आहेत. मग त्यांना आश्रय देणाऱ्या देशांसाठी ते सुरक्षित कसे असू शकतील' असा प्रश्‍न राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज (शनिवार) उपस्थित करत रोहिंग्या निर्वासितांबाबत केंद्र सरकारने घेतलेल्या भूमिकेस पाठिंबा दिला. 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमीच्या सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवानी उपस्थित होते. मुंबईत काल झालेल्या चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांना भागवत यांनी श्रद्धांजली वाहत ही घटना दु:खद असल्याचे सांगितले. 

या भाषणामध्ये भागवत यांनी विविध मुद्यांवर केंद्र सरकारची पाठ थोपटली. 'डोकलाम प्रश्‍नी भारताने घेतलेली भूमिका ही देशाच्या सामर्थ्याचे प्रतीक होते' अशा शब्दांत त्यांनी केंद्र सरकारचे कौतुक केले. जम्मू-काश्‍मीरमध्ये दहशतवाद पसरविणाऱ्या घटकांना रोखण्यातही केंद्र सरकारला यश मिळत आहे, असे ते म्हणाले. 'राष्ट्रविरोधी घटकांना मिळणारे अर्थसाह्य बंद करण्यासाठी सरकारने ठोस पावले उचलली. दहशतवादी घटनांमध्ये पाकिस्तानचा संबंध असल्याचेही वेळोवेळी सिद्ध होत आहे', असेही त्यांनी सांगितले. 

मानवतावादाकडे लक्ष देताना देशाच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केले जाऊ नये, अशी अपेक्षा भागवत यांनी व्यक्त केली. रोहिंग्या निर्वासितांना मानवतेच्या मुद्यावर भारतात स्थान दिले पाहिजे, अशी भूमिका काही गटांकडून घेतली जात आहे. यासंदर्भात भागवत म्हणाले, "म्यानमारमध्ये दहशतवादी कारवायांमध्ये हात असल्यामुळे त्या सरकारने रोहिंग्या निर्वासितांविरोधात कारवाई सुरू केली. जागतिक पातळीवर मानवतावाद दाखविताना आपल्या देशातील सर्वसामान्यांकडे दुर्लक्ष करत नाही ना, हेही पाहावे लागेल. बांगलादेशमधून होणाऱ्या घुसखोरीवर अद्याप आपण तोडगा काढू शकलेलो नाही. त्यातच आता ही समस्या उभी ठाकली आहे. आपण या लोकांना (रोहिंग्या) भारतात राहण्याची परवानगी दिली, तर इथल्या रोजगाराच्या संधींवरही त्याचा परिणाम होईल. तसेच, राष्ट्रीय सुरक्षेलाही ते धोकादायक असेल.''

Web Title: marathi news marathi websites Nagpur News RSS Rohingya