‘मिनरल’च्या नावावर आरोग्याशी खेळ 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 मार्च 2018

नागपूर - शहरातच नव्हे तर ग्रामीण भागातील समारंभ, लग्न आदी कार्यात मोठ्या प्रमाणात पिण्याच्या पाण्याच्या कॅन वापरल्या जातात. कॅनविक्रेते मिनरल वॉटर असल्याच्या  नावावर केवळ थंड पाणी ग्राहकांना पुरवीत आहेत. कॅनमधील पाणी खरेच मिनरलयुक्त आहे की नाही?, याबाबत तपासणी करून विक्रेत्यांवर ‘फूड सेफ्टी’ कायद्याअंतर्गत कारवाईची मागणी अ. भा. ग्राहक पंचायतचे विदर्भ प्रांताध्यक्ष गजानन पांडे यांनी केली. 

सध्या लग्नसमारंभ मोठ्या प्रमाणात होत असून, प्रत्येक ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या कॅन दिसून येतात. या कॅनवर संबंधित विक्रेत्यांची नावे असून, मिनरल वॉटर असल्याचेही नमूद आहे. परंतु, हे पाणी खरोखरच शुद्ध आहे का? असा सवाल उपस्थित करीत पांडे यांनी या पाण्यावर कोणतीही प्रक्रिया न करता हे थंड पाणी आपल्या गळी उतरवले जात असल्याचे वास्तव मांडले. युव्ही स्टरीलायझेशन, सूक्ष्म गाळणी व ओझोनायझेशन आदी प्रक्रिया करूनच पाणी कॅनद्वारे नागरिकांना मिळणे अपेक्षित आहे. परंतु, मिनरल वॉटरच्या नावाखाली थंड पाण्याचा गोरखधंदा सुरू आहे. लग्नसमारंभ किंवा इतर कार्यक्रमांमध्ये २० ते ६० रुपयांपर्यंत एका कॅनसाठी आकारून ग्राहकांची फसवणूक केली जात असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. नागरिकांच्या आरोग्याशी सुरू असलेला हा खेळ प्रशासनाच्या लक्षात येत नाही काय? असा सवालही ग्राहक पंचायतने उपस्थित केला. या पाण्याचे अनेक कारखाने आहेत. त्यावर अन्न व औषधी प्रशासन, आरोग्य विभाग तसेच वैधमापन शास्त्र विभागाचे कुठलेही नियंत्रण नसल्याचे दिसून येते. कारखान्याला परवानगी कुणी दिली?  असा सवाल करीत गोरखधंदा 

करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी त्यांच्यासह प्रांत सचिव संजय धर्माधिकारी, जिल्हा संघटनमंत्री गणेश शिरोळे, अशोक पात्रीकर, सहसंघटनमंत्री नरेंद्र कुळकर्णी, प्रांत महिला प्रमुख तृप्ती आकांत, ॲड. स्मिता देशपांडे, श्रीपाद भट्टलवार, विनोद देशमुख, श्रीपाद हरदास, उदय दिवे, दत्तात्रय कठाळे, संध्या पुनियानी, विलास ठोसर व इतर पदाधिकाऱ्यांनी केली. 

अन्न व औषधी प्रशासन तसेच आरोग्य विभागाच्या सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेच्या माध्यमाद्वारे कॅनमधील पाण्याची चाचणी व शहानिशा होत नसल्याची तक्रार वारंवार अन्न व औषधी प्रशासन, वैधमापनशास्त्र विभागाकडे केली आहे. परंतु, प्रशासन दखल घेत नसल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे.
-गजानन पांडे, विदर्भ प्रांताध्यक्ष, अ. भा. ग्राहक पंचायत.

Web Title: marathi news Mineral water health nagpur news