आता एसी, डक्‍टिंग स्वच्छ करा रोबोटने

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 फेब्रुवारी 2018

विदर्भातील पहिलाच स्टार्ट अप
निर्मिती रोबोटिक्‍स या कंपनीत सहा दिव्यांग कामगार असून तेही या संशोधनाचा मुख्य भाग आहेत. गेल्या पाच वर्षांपासून कंपनी या तंत्रज्ञानावर संशोधन करीत होते असे निर्मिती  रोबोटिक्‍सचे संचालक जय मोटघरे यांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय कंपनीसोबत करार केलेला हा विदर्भातील पहिलाच स्टार्ट अप आहे, असे मोटघरे यांनी सांगितले.

नागपूर - उन्हाळा आला की, एसी, कुलर आणि डक्‍टिंगची थंड हवा सर्वांनाच  हवीहवीशी वाटते. कुलरची स्वच्छता करताना त्यातून निघणारी घाण सर्वांनाच दिसते. मात्र,  डक्‍टिंग अनेक वर्षे स्वच्छच केले जात नसल्याने या हवेतून शरीरासाठी घातक असलेली प्रदूषित हवा श्‍वासोच्‍छवासाद्वारे शरीरात जाते. डक्‍टिींगचा आकारही निमुळता असल्याने त्याची स्वच्छता करणेही अशक्‍य होते. यावर येथील निर्मिती रोबोटिक्‍स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडने  ओझोनायझेशन करणारे रोबोट विकसित केले आहे. जर्मनीची शुको ही कंपनी या तंत्रज्ञानाच्या प्रेमात पडल्याने त्यांनी निर्मिती रोबोटिक्‍ससोबत सामंजस्य करार केला आहे. युरोपमध्ये ती कंपनी या तंत्रज्ञानाचे मार्केटिंग करणार आहे. 

निर्मिती रोबोटिक्‍सने विकसित केलेल्या या तंत्रज्ञानामुळे हॉस्पिटल, रेल्वे कोचमधील एसी व हॉटेल्समधील डक्‍टिंगचे लहानात-लहान आकाराच्या डक्‍टिंग या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने स्वच्छ करणे शक्‍य झाले आहे.

ओझोनायझेशनच्या साहाय्याने त्याची योग्य स्वच्छता करण्यात येत  आहे. सध्या मध्य रेल्वे, मुंबईतील काही रुग्णालयांत या तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. काही दिवसांपूर्वी नागपूर भेटीवर आलेल्या जर्मन उद्योजकांच्या शिष्टमंडळानेही या तंत्रज्ञानाचे विशेष कौतुक केले होते. याचीच दखल घेत जर्मनीच्या शुको या वायुप्रदूषणाच्या संदर्भात काम  करणाऱ्या कंपनीने या तंत्रज्ञानामध्ये रस दाखवला. अल्पावधीतच तंत्रज्ञानाचे आदानप्रदानसंदर्भात सामंजस्य करार केला आहे. 

याबद्दल विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अतुल पांडे, सचिव सुहास बुद्धे यांनी निर्मिती रोबोटिक्‍स लिमिटेडच्या या कामगिरीबद्दल कौतुक केले. या वेळी निर्मिती रोबोटिक्‍सचे व्यवस्थापकीय संचालक सुदर्शन शेंडे, मोटिव्हेटर योगिता कस्तुरे उपस्थित होते.

Web Title: marathi news nagpur news ac ducting clean robot