साहित्य संमेलन बडोद्यातच; स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच संधी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 सप्टेंबर 2017

नागपूर - आठ दिवसांच्या "राजकीय' घडामोडींनंतर 91 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन बडोद्यात होणार असल्याची घोषणा महामंडळाने आज केली. मराठवाडा साहित्य परिषदेने अखेरच्या क्षणापर्यंत सर्वतोपरी केलेल्या प्रयत्नांना अखेर यश आल्याची प्रतिक्रिया यानिमित्ताने साहित्य वर्तुळात उमटत आहे. 

संमेलन स्थळाच्या वादानंतर हिवरा आश्रमाने माघार घेतल्यानंतर बडोद्याचा एकमेव पर्याय महामंडळापुढे होता. गेले पाच दिवस बडोद्यातील मराठी वाङ्‌मय परिषदेची तयारी आहे किंवा नाही, याची चाचपणी करण्यात आली. बडोद्याकडून तयारी असल्याचे पत्रही प्राप्त झाले. महामंडळाच्या कार्यकारिणीशी सल्लामसलत केल्यानंतर अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी बडोद्याला यजमानपद देण्याचा निर्णय घोषित केला. आज रात्री पावणेआठच्या सुमारास यजमान संस्थेकडून निर्णय मान्य असल्याचे पत्र प्राप्त झाल्यावरच बडोद्याची घोषणा करण्यात आली. 

"महामंडळाच्या सर्व सभासदांकडे परिपत्रक पाठवून महामंडळाची कामे निर्णित करण्याचा जो अधिकार महामंडळ अध्यक्षांना दिलेला आहे, त्याअंतर्गत ही कार्यवाही करण्यात आली. त्यानुसारच रीतसर प्रक्रिया पार पाडून महामंडळाने निर्णय घेतला,' असे डॉ. जोशी यांनी पत्राद्वारे कळविले आहे. यापूर्वी बडोद्यात 1909, 1921 आणि 1934 अशी तीन साहित्य संमेलने झाली आहेत. त्यामुळे स्वतंत्र भारतात होणारे बडोद्यातील हे पहिलेच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन असेल. 

Web Title: Marathi News nagpur news Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan Baroda