मुक्‍या वेदनांचा आक्रोश

केवल जीवनतारे
बुधवार, 28 फेब्रुवारी 2018

नागपूर - रुग्णालयात वडील कर्करोगाच्या वेदनांनी विव्हळत आहेत. आईच्या दोन्ही डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहत आहेत. आठ ते नऊ वर्षांची जुळी मुले हे सारे दुःखाने माखलेले दृश्‍य बघत आहेत. त्यांना ना वडिलांच्या वेदनांचे स्वर ऐकू येतात ना आईचा हंबरडा. जन्मत: मुके-बहिरेपण नशिबी आल्याने हे चिमुकले व्यक्‍त होऊ शकत नाही. या जुळ्यांच्या वेदनांचा आक्रोश त्यांच्या चेहऱ्यावर तेवढा दिसतो. आई रडत असताना त्यांच्या डोळ्यांतून वाहणारे पाणी त्यांना दुःख झाल्याची जाणीव करून देते.  

ही एखाद्या चित्रपटातील कथा नाही तर रामदासपेठेतील एका रुग्णालयसमोरची ही सत्यघटना. नजर लागेल असे या जुळ्यांचे रूप. नाव राम आणि श्‍याम. पोटात भूक असली की, हातवारे करून खाऊ घाला अशी विनवणी ते करतात. या चिमुकल्यांचे दुःख या परिसरात ठाऊक झाले. यामुळे या जुळ्यांना जवळच्या भोजनालयात जेवण दिले जाते. चिमुकल्यांचे जेवण आटोपत असताना श्‍याम इशाऱ्यानेच दोन पोळ्या आणि भाजी बांधून मागतो. पोळी भाजी आईसाठी मागत असल्याचे तो हातवारे करीत सांगतो.

पस्तीशीतील महिला आपल्या या काळजाच्या तुकड्यांना शोधत येते. न सांगता आल्याने दोघांनाही ती मारते. रडता-रडता या मुलांनी हातातील पोळी भाजी आईला दिली. सारा प्रकार त्या मातेच्या लक्षात येतो, त्यावेळी ती माता दोन्ही मुलांना छातीशी कवटाळून रडू लागली. हृदय हेलावून टाकणारे दृश्‍य बघताना अंगावर शहारे येतात. चिमुकल्या राम अन्‌ श्‍यामचे डोळे पुसतानाच ती माता व्यक्‍त झाली. हे कुटुंब मूळचे बालाघाटचे. सहा महिन्यांपूर्वी नवऱ्याला कर्करोगाचे निदान झाले. उपचारासाठी नागपुरात आणले. होते नव्हते सारेकाही विकले. नवऱ्यावर उपचार करण्यासाठी ती धुणीभांडी करते.

मिळेल तो पैसा उपचारासाठी खर्च करीत आहे. दोन्ही मुले मुकी आणि बहिरी असल्याचे उमेदीच्या वयात कळले. दोघांनाही ऐकू येत नाही आणि  बोलूही शकत नाहीत. मात्र, दोघेही शाळेत जातात. हुशार आहेत, असेही सांगायला ती माता विसरली नाही.

छोटी खल्लास हो गयी..!
नियतीसमोर कुणाचे चालत नाही म्हणतात, तेच खरे आहे. सारे दुःख या गरिबांच्या घरात सोडून नियती मोकळी झाली. 

नवऱ्याला कॅन्सर झाला. दोन मुले मुकी आणि बहिरी. एक चिमुकली कडेवर. तर सात  महिन्यांपूर्वी ‘छोटी नामकी सात साल की बेटी खल्लास हो गयी. बचाने की कोशिश की, लेकीन नहीं बची.’ सारे दुःख उराशी कवटाळून ते पेलवत नवऱ्यावरील उपचारासाठी संघर्ष सुरू आहे, तरीही त्या मातेच्या बोलण्यात आत्मविश्‍वास आहे. एकच ‘ये दुखभरे दिन निकल जाएंगे’ असे ती बोलून दाखवते.

Web Title: marathi news nagpur news cancer sickness health