शहरातील विकासकामे झाली ठप्प

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 फेब्रुवारी 2018

नागपूर - थकीत देयकांसाठी वारंवार तगादा लावूनही मिळत नसल्याने महापालिकेतील कंत्राटदारांनी काम बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शहरातील विकासकामे ठप्प होण्याच्या मार्गावर आहेत. वारंवार निवेदन देऊनही अधिकारी तोडगा काढत नसल्याने कंत्राटदारांत संतापाची लाट असून, त्यांच्यात नैराश्‍य पसरले आहे. 

शहरातील सिवेज लाइन, पावसाळी नाल्या, चेंबर, चेंबरची झाकणे, वस्त्यांतील सिमेंट रस्ते, महापालिकेकडून तयार करण्यात येणाऱ्या लहान मोठ्या कार्यालयीन इमारती आदींची कामे कंत्राटदारांकडून केली जातात.

नागपूर - थकीत देयकांसाठी वारंवार तगादा लावूनही मिळत नसल्याने महापालिकेतील कंत्राटदारांनी काम बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शहरातील विकासकामे ठप्प होण्याच्या मार्गावर आहेत. वारंवार निवेदन देऊनही अधिकारी तोडगा काढत नसल्याने कंत्राटदारांत संतापाची लाट असून, त्यांच्यात नैराश्‍य पसरले आहे. 

शहरातील सिवेज लाइन, पावसाळी नाल्या, चेंबर, चेंबरची झाकणे, वस्त्यांतील सिमेंट रस्ते, महापालिकेकडून तयार करण्यात येणाऱ्या लहान मोठ्या कार्यालयीन इमारती आदींची कामे कंत्राटदारांकडून केली जातात.

कंत्राटदारांनी महापालिकेची ही कामे केली असून, दिवाळीपूर्वी पूर्ण केलेल्या कामांचे १०० कोटी रुपये थकीत आहेत. या थकीत रकमेसाठी महापालिकेतील कंत्राटदारांनी महापौर, आयुक्त, स्थायी समिती अध्यक्षांसोबत अनेकदा चर्चा केली. प्रत्येकानेच आश्‍वासन दिले. परंतु, अद्याप थकीत रकमेतील पैदेखील कंत्राटदारांना मिळाली नाही. मात्र, कंत्राटदारांनी कामे सुरूच ठेवली. दिवाळी ते होळीपर्यंत कंत्राटदारांनी १०० कोटींची कामे केली, या कामांचे बिल अद्याप तयार झाले नाहीत. त्यामुळे महापालिकेकडे कंत्राटदारांचे दोनशे कोटी थकले असून, आता त्यांच्याकडेही पुढील कामे करण्यासाठी पैसा नाही. याशिवाय कंत्राटदारांनी स्वतःची पत वापरून सिमेंट, हार्डवेअर, बिल्डिंग मटेरियल सप्लायर्सकडून कामासाठी उधारीवर साहित्य घेतले. आता ते कंत्राटदारांकडे पैशासाठी तगादा लावत असून, अनेक कंत्राटदारांमध्ये नैराश्‍य आले आहे. काही कंत्राटदारांकडे कामगारांना देण्यासाठीही पैसे नाहीत, असे महापालिका कंत्राटदार असोसिएशनचे अध्यक्ष विजय नायडू यांनी सांगितले. त्यामुळे आज पुन्हा एकदा  निवेदन घेऊन कंत्राटदार आयुक्तांकडे पोहोचले. परंतु, आयुक्त नसल्याने त्यांनी मुख्य वित्त अधिकाऱ्यांना निवेदन दिले. परंतु, त्यांनी समाधानकारक उत्तर न दिल्याने आता कंत्राटदारांनी काम बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. निवेदन देणाऱ्यांत उपाध्यक्ष प्रकाश पोटपोसे, सचिव संजीव चौबे, रमजान भाई, प्रशांत ठाकरे, मतीन भाई, युवराज मानकर, सूर्यकांत दरबेश्वर, प्रशांत  देशमुख, हाजी परवेज़, हाजी नाज़िम भाई, आफताब भाई, राजू ताजने, राजू बजाज, राजा  अग्रवाल, नरेन हटवार, शाहिद खान, रफ़ीक अहमद, सुकेश बघेल, विनोद दंडारे, अजय लालवानी, रामकुशल कुर्रे, सलीम अन्सारी, नागसेन हिरेखान, मिलिंद डोंगरे, राकेश बालसराफ, अनंत जगनित, सुरेश गेडाम, विनोद मडावी, नितिन चौबे, अखिल नगरारे, विनोद अतकर आदी कंत्राटदार उपस्थित होते. 

वॉर्ड निधीची कामे बंद, नगरसेवकांत संताप 
थकीत रकम न मिळाल्याने कंत्राटदारांनी वॉर्ड निधीची कामेही बंद केली. त्यामुळे नगरसेवकांत संताप आहे. मात्र, कंत्राटदारांची देयकेच न मिळाल्याने कंत्राटदारांना काय म्हणणार? असे एका नगरसेवकाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. प्रभागातील सिवेज लाइन, चेंबरच्या दुरुस्तीची कामेही होत नसल्याने नागरिक नगरसेवकांवर ओरडत आहे. त्यामुळे आता नगरसेवकांपुढे नागरिकांना काय उत्तर द्यावे, असा प्रश्‍न पडला आहे. 

वित्त अधिकाऱ्यांकडून अपमानास्पद वागणूक 
थकीत देयकांसाठी अनेकदा कंत्राटदार महापालिकेच्या वित्त अधिकाऱ्यांकडे जातात. मात्र, वित्त अधिकारी अपमानास्पद वागणूक देत असल्याची खंत काही कंत्राटदारांनी व्यक्त केली. ‘वित्त अधिकाऱ्यांकडे हक्काचे पैसे मागतो, भीक मागायला जात नाही. मात्र, त्यांच्या हेकेखोरपणामुळे कंत्राटदारांचा तोल जाण्याची शक्‍यता नाकारता येत नाही’, असेही एका कंत्राटदाराने सांगितले. यापूर्वी असे कधी घडले नाही, अशी पुश्‍तीही या कंत्राटदाराने जोडली.

Web Title: marathi news nagpur news city development work stop