काँग्रेसमध्येच राहीन, भाजपमध्ये नाही

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 फेब्रुवारी 2018

नागपूर - गेल्या ५० वर्षांपासून मी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करीत आहे.  या काळात मी पदाची कधीही अपेक्षा केली नाही. पक्षाने मला खूप काही दिले. माझी विचारधारा काँग्रेसची असल्याने भारतीय जनता पक्षात जाण्याचा प्रश्‍नच उद्भवत नसल्याचे माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांनी आज स्पष्ट केले.

नागपूर - गेल्या ५० वर्षांपासून मी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करीत आहे.  या काळात मी पदाची कधीही अपेक्षा केली नाही. पक्षाने मला खूप काही दिले. माझी विचारधारा काँग्रेसची असल्याने भारतीय जनता पक्षात जाण्याचा प्रश्‍नच उद्भवत नसल्याचे माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांनी आज स्पष्ट केले.

पक्षविरोधी कारवाया केल्याचा आरोप करून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीने काही दिवसांपूर्वीच माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांना पक्षातून निष्कासित केले आहे. या संदर्भात आज त्यांनी पत्रकार परिषदेत भूमिका स्पष्ट केली. प्रदेश काँग्रेस समितीने केलेली कारवाई ही एकतर्फी असून यामागे सूडबुद्धी असल्याचा आरोप त्यांनी केला. काँग्रेसच्या काही नेत्यांनी काँग्रेस पक्षाची घटना व नियमांच्या विरोधात कारवाई केली आहे. प्रदेश काँग्रेसकडून मला अद्यापपर्यंत कोणतेही पत्र मिळालेले नाही. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मला कधीही बोलाविले नाही. या एकतर्फी कारवाईची माहिती वर्तमानपत्रातूनच कळल्याचा दावा त्यांनी केला. 

गेल्या ५० वर्षांपासून मी काँग्रेस पक्षाचे काम करीत आहे. काँग्रेस पक्षाच्या विचारधारेशी मी आयुष्यभर जुळलो आहे. या विचारधारेपासून मला कुणीही वेगळे करू शकत नाही. आयुष्याच्या अखेरपर्यंत मी काँग्रेसचा कार्यकर्ता राहणार आहे. हे पद कुणीही हिरावू शकत नाही, असा युक्तिवाद करून त्यांनी भाजपमध्ये जाणार नसल्याचे स्पष्ट केले. 

या कारवाईविरोधात आपण अ. भा. काँग्रेस समितीकडे दाद मागणार असल्याचे सांगून ते म्हणाले, गुजरातच्या निकालाने पक्षाला नवसंजीवनी मिळाली आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पक्षापासून दूर गेलेल्यांना जवळ आणण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे. हे चित्र असताना पक्षातून निष्ठावंतांना पक्षातून काढून नागपुरात कोण, कोणत्या पक्षाला फायदा पोहोचवित आहे, याचे स्पष्टीकरण आपण पक्षश्रेष्ठीकडे देऊ. माझ्यावर केलेल्या कारवाईची आपण पक्षश्रेष्ठींकडे लवकरच दाद मागणार असल्याचे चतुर्वेदी यांनी सांगितले.

Web Title: marathi news nagpur news congress bjp politics satish chaturvedi