मनमानी करणाऱ्यांना वेसण घालणार काँग्रेस

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 फेब्रुवारी 2018

नागपूर - पक्षात राहून मनमानी करणाऱ्यांना वेसण घालण्यासाठी शहर काँग्रेसने पुढाकार घेतला आहे. पक्षाची शिस्त पाळणे बंधनकारक असून पदाधिकाऱ्यांची जबाबदारी, अधिकार,  वरिष्ठ नेत्यांचे आदेश पाळणे, कार्यकर्त्यांची भूमिका याबाबत आचारसंहिता तयार करण्याचा ठराव आज शहर काँग्रेसच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. आचारसंहितेचा प्रस्ताव प्रदेश काँग्रेसकडे पाठविण्यावरही शिक्कामोर्तब करण्यात आले. 

नागपूर - पक्षात राहून मनमानी करणाऱ्यांना वेसण घालण्यासाठी शहर काँग्रेसने पुढाकार घेतला आहे. पक्षाची शिस्त पाळणे बंधनकारक असून पदाधिकाऱ्यांची जबाबदारी, अधिकार,  वरिष्ठ नेत्यांचे आदेश पाळणे, कार्यकर्त्यांची भूमिका याबाबत आचारसंहिता तयार करण्याचा ठराव आज शहर काँग्रेसच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. आचारसंहितेचा प्रस्ताव प्रदेश काँग्रेसकडे पाठविण्यावरही शिक्कामोर्तब करण्यात आले. 

शहर काँग्रेसची बैठक दर महिन्याला होते. या बैठकीला मात्र सतीश चतुर्वेदी यांच्या निष्कासनाची पार्श्‍वभूमी असल्याने महत्त्व आले होते. शहर काँग्रेस अध्यक्ष विकास ठाकरे यांच्या अध्यक्षतेत चिटणीस पार्कजवळील देवडिया काँग्रेस भवनात शहर काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. चतुर्वेदी यांच्या निष्कासनानंतर त्यांच्या समर्थकांबाबत शहर काँग्रेस काय भूमिका घेणार? यासाठीही या बैठकीकडे अनेकांकडे लक्ष लागले होते. शहरातील सर्व काँग्रेस कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांची मोट बांधून संघटना बळकट करण्याचा ठरावावर चर्चा झाली. यावर काही कार्यकर्त्यांनी मत मांडले.

पक्षात आता शिस्तीवरही भर दिला जाणार आहे. सध्या शहर काँग्रेसची कुठलीही आचारसंहिता नसल्याने पदाधिकारी, कार्यकर्ते मनमानी करतात. त्यामुळे गटबाजीला प्रोत्साहन मिळून निष्कासनासारखी कारवाई करावी लागते. परंतु पदाधिकारी, कार्यकर्त्यांसाठी शहर काँग्रेसचीच आचारसंहिता असल्यास कुणीही मनमानी निर्णय घेणार नाही, त्यातून पक्षात मतभेदालाही ब्रेक लागतील, असा ठराव ठाकरे यांनी मांडला. आचारसंहिता तयार केल्यानंतर ती प्रदेश काँग्रेसकडे मंजुरीसाठी पाठविण्याचा ठरावही सर्वानुमते मंजूर करण्यात आला. त्यामुळे भविष्यात शहर काँग्रेसमध्ये शिस्त दिसण्याची शक्‍यता आहे. याशिवाय शहरात सिमेंट रस्ते व मेट्रोच्या कामामुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासाबाबत णसंबंधित संस्थांकडे निवेदन देणे, प्रभाग, ब्लॉकमधील नागरिकांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, पुढील लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने कार्यकर्त्यांनी तयारी करावी, असे आवाहन यावेळी  करण्यात आले. बैठकीत माजी विरोधी पक्षनेते संजय महाकाळकर, माजी नगरसेवक प्रशांत धवड, ॲड. अभिजित वंजारी, अ. भा. युवक काँग्रेसचे सचिव बंटी शेळके, डॉ. गजराज हटेवार, नगरसेविका दर्शनी धवड, नगरसेवक नितीश ग्वालवंशी, हरीश ग्वालवंशी, जयंत लुटे, राजेश कुंभलकर,  अनिल पांडे, रमण पैगवार आदी मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. 

बंटी शेळके यांचा गौरव 
अखिल भारतीय युवक काँग्रेसच्या सचिवपदी नियुक्त करण्यात आल्याबाबत नगरसेवक बंटी शेळके यांचा शहर काँग्रेस अध्यक्ष विकास ठाकरे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. या वेळी ठाकरे यांनी पुष्पहाराने त्यांचे स्वागत केले. संधी मिळाल्याने राष्ट्रीय स्तरावरही बंटी शेळके आपल्या कार्याची छाप पाडतील, असा विश्‍वास ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला तर ज्येष्ठ नेत्यांच्या प्रोत्साहनामुळेच मोठी संधी मिळाल्याचे शेळके म्हणाले. 

चतुर्वेदी समर्थकांची अकड कायम 
चतुर्वेदी यांच्या निष्कासनानंतर लगेच त्यांच्या समर्थकांत खळबळ माजली होती. या पार्श्‍वभूमीवर शहर काँग्रेसच्या बैठकीत ते हजेरी लावतील, अशी अपेक्षा होती. परंतु, शहर काँग्रेसच्या बैठकीकडे पाठ फिरवून चतुर्वेदी यांच्याशीच प्रामाणिक असल्याचे त्यांच्या समर्थकांनी दाखवून दिले. त्यामुळे आता शहर काँग्रेस त्यांच्या समर्थकांबाबत काय भूमिका घेईल? याबाबत आता उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

Web Title: marathi news nagpur news congress politics