डागा रुग्णालयात बाळंतिणीचा मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 4 मार्च 2018

नागपूर - मध्य नागपुरातील डागा स्मृती शासकीय स्त्री रुग्णालयात शनिवारी सकाळी एका महिलेने जुळ्या मुलांना जन्म दिला. मात्र जन्म देताच ही महिला दगावली. आकस्मिक निधनाने खळबळ उडाली. डॉक्‍टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप करीत नातेवाइकांनी शस्त्रक्रियागृहात शिरून गोंधळ घातला. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण होते. विशेष असे की, या महिलेची प्रसूती मुदतीपूर्वी झाली असून माता एचआयव्ही पॉझिटीव्ह असल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. 

नागपूर - मध्य नागपुरातील डागा स्मृती शासकीय स्त्री रुग्णालयात शनिवारी सकाळी एका महिलेने जुळ्या मुलांना जन्म दिला. मात्र जन्म देताच ही महिला दगावली. आकस्मिक निधनाने खळबळ उडाली. डॉक्‍टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप करीत नातेवाइकांनी शस्त्रक्रियागृहात शिरून गोंधळ घातला. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण होते. विशेष असे की, या महिलेची प्रसूती मुदतीपूर्वी झाली असून माता एचआयव्ही पॉझिटीव्ह असल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. 

ताजबाग येथील महिलेस शुक्रवारी पहाटे तीन वाजताच्या सुमारास प्रसवकळा असह्य झाल्याने डागा रुग्णालयात उपचाराला आणले. सातव्या महिन्यातच प्रसव कळा आल्या असून ही महिला एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्याचे निदर्शनास आले. तिच्यावर एआरटी केंद्रात उपचार सुरू होते. रुग्णालयात पोहचेपर्यंत गर्भातील जुळ्यांपैकी एका मुलाचे डोके बाहेर येत होते. अत्यंत बिकट अवस्थेत नातेवाइकांनी रुग्णालयात आणले. डागात उपस्थित निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी बाळंतपणाची तडकाफडकी तयारी सुरू केली.  सकाळी साडेसात वाजता पहिल्या बाळाला जन्म दिला. दुसरे बाळ गर्भाशयाच्या पिशवीतून बाहेर येत असतानाच बाळाची नाळ आत अडकली. याच घडामोडीत श्‍वास अडकला आणि प्रसूतीदरम्यान हृदयक्रिया थांबली. सकाळी साडेआठच्या दरम्यान बाळंतपणादरम्यान मातेचा मृत्यू झाला. डागातील डॉक्‍टरांनी समयसूचकता दाखवित दोन्ही नवजात शिशूंचे प्राण वाचविले. मात्र हे शिशूदेखील कमी वजनाचे आणि मुदतपूर्व काळात जन्माला आल्याने त्यांची परिस्थिती नाजूक आहे. गर्भातील जुळ्या नवजात बालकांचे प्राण वाचविण्यात डॉक्‍टरांनी अथक प्रयत्नांती यश मिळविले.

जन्मतःच जुळी आईच्या प्रेमाला पारखी 
प्रत्येक चिमुकल्या मुलाला आई म्हणजे त्यांच्यासाठी स्वर्ग असते. मात्र नियती कधीकधी भयावह रूप धारण करते. शनिवारी डागात डोळे उघडताच जुळ्यांच्या डोक्‍यावरचे आईचे छत्र नियतीने हिरावून घेतले. दोन्ही मुले आईच्या प्रेमाला पारखी झाली. आयुष्यभर मातेचे प्रेम मिळणार नाही. मात्र माता बनून त्यांचा सांभाळ करणार, अशी भावना वडिलांनी बोलून दाखवली.  

गर्भवती महिलांवर येथे तत्काळ उपचार होतात. दरवर्षी १५ हजार प्रसूती होतात. विशेष असे की, माता मृत्यू आणि बालमृत्यू येथे नगण्य आहेत. ही महिला अतिशय बिकट स्थितीत ही डागात उपचाराला आली होती. मुदतपूर्व प्रसूती कळा आल्याने गुंतागुंत आणि जोखीम वाढली होती. त्यात एचआयव्ही बाधित असल्याने अशक्तपणा होता. आईचा जीव वाचवण्याला प्राधान्य असते. मातेसह गर्भातील जुळ्यांचे प्राण वाचविण्यासाठी डॉक्‍टरांनी शर्थीचे प्रयत्न केले. प्रसूतीदरम्यान गुंतागुंत वाढल्याने काही सेकंदात कार्डिॲक अरेस्ट आला. त्यामुळे हृदयक्रिया बंद पडून बाळंतीण दगावली. 
-डॉ. सीमा पारवेकर,  वैद्यकीय अधीक्षक, डागा स्मृती शासकीय स्त्री रुग्णालय, नागपूर.

Web Title: marathi news nagpur news Daga hospital vidarbha