प्रॉपर्टी डीलरवर फसवणुकीचा गुन्हा 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 मार्च 2018

नागपूर - बनावट कागदपत्रांच्या आधारावर जमिनीची विक्री करणाऱ्या प्रॉपर्टी डीलरवर वाडी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. दुसऱ्याच्या जमिनीवर प्रॉपर्टी डीलरने अवैधरीत्या कब्जा करून ले-आउट बनवून अनेकांना लाखोंनी चुना लावल्याची माहिती समोर आली आहे. मोहम्मद इस्माईल शेख इब्राहिम (रा. सदर) असे आरोपी प्रॉपर्टी डीलरचे नाव आहे. 

वाडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहम्मद इमरान हाजी मोहम्मद इसराईल (रा. बैरामजी टाउन) यांच्या तक्रारीवरून वाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. इस्माईल हा शहरात इस्माईल प्लॉटवाले नावाने चर्चित आहे. इमरान हे डॉली इंटरप्रायजेसचे संचालक आहेत. त्यांच्या कंपनीची हिंगणा तालुक्‍यातील वडधामनात 4.43 हेक्‍टर जमीन आहे. ही जमीन मोक्‍याच्या जागेवर असून जमिनीला चांगली मागणी आहे. ही बाब हेरून आरोपी इस्माईलने वडधामनातील या जमिनीचे बनावट दस्तावेज बनवले. बनावट कागदपत्रांच्या आधारे त्या जमिनीवर ले-आउट टाकले. भूखंड विक्रीसाठी उपलब्ध करून अनेकांशी त्याने भूखंड विक्रीचा करारनामा केला. अनेकांकडून लाखो रुपयांची रक्‍कम हडपली. त्यानंतर बनावट कब्जापत्र देऊन उर्वरित रक्‍कमही वसूल केली. कागदपत्रांची चाचपणी केल्यानंतर इमरान यांना फसवणूक केल्याचा प्रकार लक्षात आला. त्यांनी वडधामनातील मूळ जमिनीचे कागदपत्र घेऊन वाडी पोलिस स्टेशन गाठले. पोलिस निरीक्षक नरेश पवार यांची भेट घेऊन त्यांना कागदपत्रे दाखवली. त्यांनी तपासणी करून खरी असल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी फसवणूक करणारा ठकबाज इस्माईलविरुद्ध गुन्हा दाखल केला. ही खबर गुंतवणूकदारांपर्यंत पोहोचताच खळबळ उडाली. अनेक भूखंड विकत घेतलेल्यांनी वाडी पोलिस स्टेशन गाठून पोलिसांना फसवणूक झाल्याची तक्रार मांडली. 

Web Title: marathi news nagpur news fraud of property dealer