रुग्णांसहित नातेवाइकांसाठी मोफत ‘ई-रिक्षा’

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 फेब्रुवारी 2018

सध्या रेल्वेस्थानक आणि मध्य प्रदेश एसटी महामंडळाच्या स्थानकावरून ही ई-रिक्षा सेवा सुरू करण्यात येईल. येथील प्रतिसाद लक्षात घेतल्यानंतर गणेशपेठ बसस्थानकावरूनही अशी ई-रिक्षा प्रवास सेवा मेडिकल, मेयोत उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना उपलब्ध करून देता येईल. 
- डॉ. वीरल कामदार, संचालक पंडित दीनदयाल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स रिसर्च ॲण्ड ह्युमन रिसोर्सेस.

नागपूर - ‘रुग्णसेवा हीच ईश्‍वर सेवा’ असे सर्वत्र बोलले जाते. मात्र, रात्री-अपरात्री सकाळीदेखील मेडिकल-मेयोत उपचारासाठी येणाऱ्या रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना पहिला  आर्थिक फटका बसस्थानक, रेल्वेस्थानकावर बसतो. मेयो-मेडिकलमध्ये पोहोचण्यासाठी अव्वाच्या सव्वा भाडे देणे गरिबांच्या आवाक्‍यात नसते. गरिबांचे हे दुःख लक्षात घेत रुग्ण व नातेवाइकांना मोफत प्रवास सेवा देण्याचा अभिनव प्रयोग उपराजधानीत राबविण्यात येणार आहे. विशेष असे की, दिव्यांग बांधवांच्या क्षेत्रात सेवाधर्म निभावणारे शेख कादीर हे ई-रिक्षाने रुपयादेखील न घेता रुग्णालयाच्या प्रवेश द्वारापर्यंत रुग्णांना तसेच नातेवाइकांना सोडण्याचे काम सातत्याने पाच ते सात तास सुरू ठेवतील.

मेडिकल आणि मेयोच्या बाह्यरुग्ण विभागात दररोज तीन ते चार हजार रुग्णांची नोंद होते. याशिवाय सोबतीला नातेवाईक असतात. येथे येणाऱ्या रुग्णांमध्ये गावखेड्यातून येणाऱ्या लोकांची संख्या अधिक असते. त्यांना ऑटोसह इतरही खासगी प्रवासासाठी पैसे खर्च करणे त्यांच्या आवाक्‍यात नसते. यामुळे अनेक रुग्णांना मेडिकल-मेयोपर्यंत पोचवणेही कठीण होऊन बसते. 

मेडिकलमधून सुपर आणि टीबी हॉस्पिटलमध्ये रेफर करण्यात आलेल्या रुग्णांनाही ऑटोतून प्रवास करावा लागत होता, यावर अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी सेवाभावी उपक्रम सुरू केला. मोफत रुग्णवाहिकेतून गेल्या दोन वर्षांपासून मोफत प्रवासाची सोय करून दिली. याचा मोठ्या प्रमाणात लाभ रुग्णांच्या नातेवाइकांना झाला.

याच धर्तीवर काही दानशूर समाजबांधवांच्या मदतीने रुग्ण आणि त्याच्या नातेवाइकांसाठी मोफत प्रवासाची योजना राबवून मेडिकल, मेयोपर्यंत सोडले जाईल. 

पंडित दीनदयाल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स रिसर्च ॲण्ड ह्युमन रिसोर्सेस आणि निखिल फर्निचर यांच्या संयुक्त मदतीतून ई-रिक्षा सुरू करण्याचा कार्यक्रम रविवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते सुरू करण्यात येईल.

Web Title: marathi news nagpur news free e rickshaw patient relatives