नक्षलवाद्यांचा 'बंद' पाळून आम्ही आमचा विकास का थांबवायचा? 

मनोहर बोरकर
शुक्रवार, 28 जुलै 2017

'जे नक्षलवादी आपल्या आदिवासी बांधवांची हत्या करतात आणि आपल्या भागाच्या विकासाला विरोध करतात, अशा नक्षलवाद्यांच्या 'बंद'ला आता आम्ही प्रतिसाद देणार नाही' असा निर्धार गावकऱ्यांनी केला आहे.

एटापल्ली (जि. गडचिरोली) : 'नक्षल सप्ताह' पाळण्याचे नक्षलवाद्यांचे आवाहन धुडकावून लावत गडचिरोलीतील अतिदुर्गम आदिवासी भागातील गावकऱ्यांनी एकजुटीने निर्धार करून नक्षलवाद्यांनी लावलेले बॅनर फाडून जाळून टाकले. मरकेगाव भागातील सावरगाव गॅरापत्ती रस्त्यावर नक्षलवाद्यांनी 28 जुलैपासून नक्षल सप्ताह पाळण्याचे आवाहन करणारे बॅनर लावले होते. नक्षलवाद्यांचे लोकशाहीविरोधी सप्ताह पाळण्याचे आणि नक्षल समर्थनाचे बॅनर गावकऱ्यांनी स्वत:हून काढून टाकले. 

'नक्षलवाद्यांच्या 'बंद'ने आतापर्यंत काय साध्य झाले आहे? त्यांचा 'बंद' पाळून आम्ही आमचा विकास का थांबवायचा' असा परखड सवाल करत गावकऱ्यांनी एकत्र येऊन नक्षलवाद्यांविरोधात आवाज उठविला आहे. 

'जे नक्षलवादी आपल्या आदिवासी बांधवांची हत्या करतात आणि आपल्या भागाच्या विकासाला विरोध करतात, अशा नक्षलवाद्यांच्या 'बंद'ला आता आम्ही प्रतिसाद देणार नाही' असा निर्धार गावकऱ्यांनी केला आहे. यंदा 'नक्षल सप्ताह' न पाळण्याचा निर्धार करत अतिदुर्गम भागातील गावकऱ्यांनी नक्षलवाद्यांच्या बॅनरची होळी केली. 

विशेष म्हणजे, याच मरकेगाव भागात 2009 मध्ये नक्षलवाद्यांच्या हिंसाचारामध्ये 15 पोलिस हुतात्मा झाले होते. आता याच भागात सामान्य गावकऱ्यांनी नक्षलवाद्यांना विरोध करण्यास सुरवात केली आहे. 'इतर गावांतील लोकांनीही नक्षलवाद्यांच्या हिंसक कृत्यांचे समर्थन न करता एकजुटीने नक्षल्यांविरोधात आवाज उठवून 'बंद' पाळू नये' असे आवाहन या गावकऱ्यांनी केले आहे. 

पोमके मालेवाडा हद्दीतील गावकऱ्यांकडूनही 'शहीद सप्ताहा'ला विरोध 
गडचिरोली जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख, कुरखेडाचे उपविभागीय पोलिस अधिकारी अभिजित फस्के यांच्या मार्गदर्शनाखाली मालेवाडा येथील पोलिस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी अजित कणसे, दुय्यम प्रभारी अधिकारी दीपक वारे, रामदास जाधव आणि इतर कर्मचाऱ्यांनी ग्रामभेटी आणि संवाद अभियान राबविले होते. यावेळी बंदुका पोलिसजमा करण्याचे आवाहनही करण्यात आले होते.

या आवाहनाला प्रतिसाद देत धानोरा तालुक्‍यातील तळेगाव, खांबाडा या नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशील गावातील ग्रामस्थांनी एक डबल बोअर रायफल, तीन भरमार बंदूका आणि तीन भरमार बंदूका बॅरल स्वत:हून पोलिसांकडे आणून दिले. यापूर्वी मालेवाडा हद्दीतील गावकऱ्यांनी सहा बंदूका आणि चार बॅरल जमा केले होते. 

Web Title: marathi news nagpur news gadchiroli news naxalism