होळीनंतर ठाकरेंविरुद्ध शिमगा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 फेब्रुवारी 2018

नागपूर - माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांना पक्षातून काढल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये प्रचंड असंतोष उफाळून आला आहे. होली मीलन कार्यक्रम घेऊन त्यानंतर शहराध्यक्ष विकास ठाकरे आणि विलास मुत्तेमवारांच्या विरोधात शिमगा करण्याचा ठराव असंतुष्टांच्या बैठकीत घेण्यात आला. या दरम्यान राहुल गांधी यांचीही भेट घेण्याचे ठरले.

नागपूर - माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांना पक्षातून काढल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये प्रचंड असंतोष उफाळून आला आहे. होली मीलन कार्यक्रम घेऊन त्यानंतर शहराध्यक्ष विकास ठाकरे आणि विलास मुत्तेमवारांच्या विरोधात शिमगा करण्याचा ठराव असंतुष्टांच्या बैठकीत घेण्यात आला. या दरम्यान राहुल गांधी यांचीही भेट घेण्याचे ठरले.

सोमवारी नगरसेवक किशोर जिचकार यांच्या घरी बैठक घेऊन महापालिकेच्या निवडणुकीत एबी फॉर्म घोटाळा करणारे आणि दादागिरी करणारे शहर काँग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे यांची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी करण्यात आली. महापालिकेतील काँग्रेसचे गटनेते तानाजी वनवे, ज्येष्ठ माजी नगरसेवक यशवंत कुंभलकर यांच्या नेतृत्वात बैठक घेण्यात आली. माजी खासदार गेव्ह आवारी, माजी आमदार अशोक धवड, माजी नगरसेवक दीपक कापसे यांच्यासह आजी-माजी नगरसेवक व पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते. सतीश चतुर्वेदी, नितीन राऊत आणि माजी मंत्री अनिस अहमद बैठकीत सहभागी झाले नव्हते. मात्र बैठक आटोपल्यानंतर सर्वांनी चतुर्वेदी यांची त्यांच्या घरी भेट घेऊन बैठकीचा सविस्तर वृत्तांत सांगितल्याचे कळते. 

चतुर्वेदी यांना पक्षातून काढल्यानंतर विकास ठाकरे यांनी रविवारी शहर काँग्रेसची बैठक घेतली. यात महापालिकेच्या निवडणुकीत पक्षविरोधी कारवाया करणारे, बैठकीला अनुपस्थित राहणाऱ्यांवर कारवाई करण्याचा ठराव घेतला. याला प्रत्युत्तर म्हणून आज जिचकार यांच्या नेतृत्वात बैठक घेण्यात आली. 

महापालिकेच्या निवडणुकीत मुत्तेमवार आणि ठाकरे यांच्याच सर्वाधिक कार्यकर्त्यांना उमेदवारी देण्यात आली होती. जिथे मिळाली नाही तेथे डबल एबी फॉर्म वाटप केले. अशा २२ जागा आहेत. यामुळे पक्षविरोधी कारवाया मुत्तेमवार-ठाकरे यांनीच केल्याचे स्पष्ट होते. आधी यांची हकालपट्टी करण्याची गरज आहे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

सतीश चतुर्वेदी यांच्यावर चुकीचे आरोप लावण्यात आले आहेत. पक्षाचे नियम व धोरणानुसार कारवाई करण्यात आली नाही. शिस्तपालन समितीकडे प्रकरण पाठविण्यात आले नाही. एकतर्फी कारवाई करण्यात आली. ज्यांच्याविरोधातच पक्षविरोधी कारवायांची तक्रार आहे त्यांनी अहवाल तयार केला. अशा लोकांकडून निष्पक्ष चौकशी होऊच शकत नाही. ठाकरे यांनी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची दिशाभूल केल्याचाही आरोप केला. 

एककल्ली कारभाराची तक्रार करणार
चतुर्वेदी-राऊत-अहमद समर्थक होळी मीलनाचा कार्यक्रम घेणार आहेत. त्यानंतर इतवारीतील गांधी पुतळ्याजवळ धरणे आंदोलन करून शक्तिप्रदर्शन केले जाणार आहे. चार मार्चपासून लोकसभेच्या अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. या दरम्यान, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांची वेळ घेऊन त्यांची भेट घेतली जाणार आहे. नागपूर शहरातील मुत्तेमवार-ठाकरे गटांच्या एककल्ली कारभाराची तक्रार करून पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी करणार असल्याचे कळते.

Web Title: marathi news nagpur news holi satich chaturvedi vikas thackeray politics