पहिला पेपर इंग्रजीचा

नागपूर - शिवाजी सायन्स महाविद्यालयातील परीक्षा केंद्रावर बैठक व्यवस्था शोधताना विद्यार्थिनी व पालक.
नागपूर - शिवाजी सायन्स महाविद्यालयातील परीक्षा केंद्रावर बैठक व्यवस्था शोधताना विद्यार्थिनी व पालक.

नागपूर - महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी बारावीची लेखी परीक्षा उद्या, बुधवारपासून (ता. २१) सुरू होत आहे. यंदा नागपूर विभागातून एक लाख ७२ हजार ४११ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. यात नागपूर शहरातील ४० हजार १७१ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. नागपूरमध्ये मेट्रो रेल्वे आणि काँक्रिटीकणाची कामे शहरभर सुरू असल्याने अनेक मार्ग बंद आहेत. काही वळविण्यात आले आहेत. यामुळे होणारी वर्दळ लक्षात घेता, परीक्षेला निघताना वेळेची काळजी विद्यार्थी व पालकांना घ्यावी लागणार आहे.

पहिला पेपर इंग्रजीचा असून, सकाळी ११ ते दुपारी दोन या वेळेत ४५२ परीक्षा केंद्रांवर तो घेण्यात येईल. परीक्षेदरम्यान कुठलाही गैरप्रकार होऊ नये यासाठी जिल्हानिहाय सात पथके तयार केली आहेत. याशिवाय अतिसंवेदनशील केंद्रांवर बैठे पथक तैनात राहील.  

दरवर्षीप्रमाणे यंदाही बोर्डाने कॉपीमुक्त अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी भरारी पथके स्थापन केलेली आहेत. मुख्य प्रवेशद्वार आणि परीक्षा हॉलमध्ये जाण्यापूर्वी विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात येईल. त्यामुळे विद्यार्थ्यांनी पेन व पॅडव्यतिरिक्त इतर कोणतीही वस्तू सोबत ठेवू नये, असे मंडळाचे विभागीय प्रभारी सचिव चव्हाण यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना परीक्षेदरम्यान मोबाईल वापरण्यास बंदी आहे. 

बारावी परीक्षेनंतर विद्यार्थ्यांच्या करिअरची दिशा निश्‍चित होते. मात्र, परीक्षेच्या अभ्यासामुळे विद्यार्थ्यांच्या मनावर ताण निर्माण होतो. विद्यार्थ्यांप्रमाणे पालकांचीही परीक्षा असते. त्यामुळे यादरम्यान भीती, पाल्याचा अभ्यास आणि आरोग्याची चिंता हे प्रमुख कारण ठरते. असे विद्यार्थी आणि पालकांचे वेळीच समुपदेशन होणे आवश्‍यक असते. त्यासाठी शिक्षण मंडळाने दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधून टेलिफोनिक समुपदेशन आणि ऑनलाइन समुपदेशनाचा लाभही उचलता येईल. 

पीबी १२ एक्‍झाम हडस हायस्कूल 
नागपूर : हडस हायस्कूलच्या फळ्यावर परीक्षा क्रमांक टाकताना शिक्षक.

पीबी एक्‍झाम १२ आंबेडकर कॉलेज
नागपूर : दीक्षाभूमी येथील आंबेडकर महाविद्यालयात टेबलवर परीक्षा क्रमांक टाकताना शिक्षिका.

अशी राहणार भरारी पथके
भरारी पथके : ४७
जिल्हानिहाय पथके : ०७
विशेष पथके : ०५
स्पेशल पथक : ०१

मार्ग खडतर, वेळेचे नियोजन करा
शहरात सर्वत्र मेट्रो रेल्वे आणि काँक्रिटीकरणाची कामे सुरू असल्याने अनेक मार्ग बंद आहेत. काही वळविण्यात आले आहेत. सकाळी नऊदरम्यान शहरात चांगलीच वर्दळ असते. यामुळे अनेक मार्गांवर वाहतूक ठप्प होते. काही परीक्षा केंद्रांपुढील तसेच आजूबाजूचे मार्ग बंद असल्याने मोठा फेरा मारावा लागतो. शिक्षण मंडळाच्या नियमानुसार, विद्यार्थ्याला अर्धा तास आधीच केंद्रावर पोहोचायचे आहे. यामुळे परीक्षेला घरून निघतानाच वेळेचा अंदाज घेऊन निघावे, असे आवाहन ‘सकाळ’तर्फे करण्यात आले आहे. 

विद्यार्थ्यांना सहकार्य करा!
शहरात विविध मार्गांवर विकासकामे सुरू असल्याने परीक्षेसाठी जाताना विद्यार्थ्यांना त्रास होऊ शकतो. त्यामुळे नागरिक, वाहतूक पोलिस अणि स्वयंसेवी संस्थांनी परीक्षार्थी विद्यार्थ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन विविध संघटनांमार्फत करण्यात आले आहे. 

विद्यार्थ्यांना सूचना 
सकाळी १० वाजता केंद्रावर रिपोर्टिंग करा
१०.२० पर्यंत खोली व बैठकीची व्यवस्था शोधा
१०.३० पर्यंत आपल्या आसनावर बसा
१०.३५ ला उत्तर पत्रिकेचे वितरण
१०.४५ प्रश्‍नपत्रिकेचे वितरण 
११ वाजता परीक्षेला प्रारंभ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com