सिंचन घोटाळ्यातील आरोपींना जामीन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 मार्च 2018

नागपूर - मोखाबर्डी सिंचन प्रकल्पाच्या गैरव्यवहारातील सहा आरोपी आणि एका सहआरोपीला आज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जामीन मंजूर केला. आर. जे. शाह प्रायव्हेट लिमिटेड व डी. ठक्कर प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक कालिंदी शाह, तेजस्विनी शाह, प्रवीण ठक्कर, विशाल ठक्कर, अरुणकुमार गुप्ता व रमेश कुमार सोनी; तसेच वरिष्ठ विभागीय लेखाधिकारी चंदन जिभकाटे यांनी जामिनासाठी न्यायालयात याचिका दाखल केली होती.

सहा कंत्राटदारांना पाच लाख रुपयांच्या; तर अधिकाऱ्याला एक लाख रुपयांच्या जातमुचलक्‍यावर जामीन देण्यात आला. शिवाय सर्व आरोपींना पासपोर्ट प्रशासनाकडे जमा करण्याचेही आदेश न्यायालयाने दिले. गेल्या आठवड्यात राज्य सरकारने शपथपत्र दाखल करून जामिनाला विरोध दर्शविला होता. जामीन दिल्यावर पुराव्यांशी छेडछाड होण्याची शक्‍यता असून, चौकशी सुरू असताना आरोपींना जामीन देणे योग्य ठरणार नाही, असे शपथपत्रात नमूद होते. त्यानंतर सर्व आरोपींनी जामिनासाठी अर्ज केला होता.

सिंचन परियोजनेअंतर्गत निर्माण होत असलेल्या मोखाबर्डी सिंचन प्रकल्पाच्या कामात मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार आढळला होता. आर. जे. शाह कन्स्ट्रक्‍शन कंपनी आणि ठक्कर कन्स्ट्रक्‍शन कंपनीला लाभ देण्यासाठी विदर्भ सिंचन विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांवर नियमांची पायमल्ली करण्याचा आरोप आहे.

Web Title: marathi news nagpur news irrigation scam accused bell